esakal | कंपनीच्या जाचक अटींमुळे बार्शी तालुक्‍यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित !

बोलून बातमी शोधा

crop insurance

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020 अंतर्गत बार्शी तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी विमा भरला आहे. तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र पीकविमा कंपनीच्या जाचक अटी व शर्थींमुळे बार्शी तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकरी विम्यापासून वंचित राहिला आहे. 

कंपनीच्या जाचक अटींमुळे बार्शी तालुक्‍यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित !
sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020 अंतर्गत बार्शी तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी विमा भरला आहे. तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र पीकविमा कंपनीच्या जाचक अटी व शर्थींमुळे बार्शी तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकरी विम्यापासून वंचित राहिला आहे. तसेच राज्य शासनाने मंजूर केलेल्या आर्थिक निधीपासून तालुक्‍यातील अनेक गावे वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

पर्जन्यवृष्टी झाल्यापासून 72 तासांच्या आत पीकविमा कंपनीस माहिती कळविणे, नुकसान झालेल्या पिकांचे लोकेशनच्या साहाय्याने पाच फोटो पाठवणे, पिकात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित लिंकवर अपलोड करणे आदी जाचक अटी लादल्या आहेत. तसेच गेल्यावर्षी किती उत्पादन निघाले यासंदर्भात क्‍लिष्ट माहिती भरण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाइल नाही. तसेच त्याचा वापर करणे अवघड असल्याने अनेकांना माहिती भरणे शक्‍य झाले नाही. तसेच ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात बरेच दिवस वीजपुरवठा खंडित राहिला, त्यामुळे मोबाईल बंद होते. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे ऑफलाइन फॉर्म जमा करणे लवकर जमले नाही. 

शेतकऱ्यांवर आलेले संकटच इतके भयानक होते की त्यात शेतकरी एक महिनाभर स्वतःला व कुटुंबाला सावरू शकला नाही. मग माहिती कशी भरणार व कृषी विभागाकडे संपर्क कधी साधणार, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. त्यावरच विमा कंपन्यांनी बोट ठेवत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे. बार्शी तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता विमा कंपनीकडून पीक विम्यासंदर्भात कोणतीच माहिती व एकूण शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. विमा प्रतिनिधी यांच्याकडे शेतकऱ्यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे. तसेच विमा कंपनीकडे तक्रार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने नेमका कोणता नियम लावून पीकविमा मंजूर केला आहे, हे कळेनासे झाले आहे, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. 

कोरोना महामारीच्या संकटात पैसे जवळ उपलब्ध नसताना इतरांकडून पैसे घेऊन खरीप पीकविमा भरला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे माझ्यासह अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरसकट पीकविमा मंजूर करून कोरोना संकटात आर्थिक आधार द्यावा. 
- रामचंद्र आगलावे, 
शेतकरी, बावी (आ) 

अतिवृष्टीत पिकांच्या झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार करूनही पीकविमा खात्यावर जमा झालेला नाही. बार्शी तालुक्‍यातील अनेक गावांत बोटावर मोजण्या इतक्‍या शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करून शेतकऱ्याची थट्टा केली आहे. नियम, अटी, शर्थी न पाहता सरसकट विमा मंजूर करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. 
- जयंत काशीद, 
शेतकरी, पिंपरी (सा) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल