ऊस जाईना म्हणून शेतकरी पेटवताहेत अख्खा फडच्या फड!

ऊसाला तोड यावी म्हणून शेतकऱ्यांना शेत पेटवून द्यायची वेळ आली आहे.
Farmer Burning their Sugarcane Farm
Farmer Burning their Sugarcane FarmSakal
Updated on

"मार्च महीना संपत आल्याने उन्ह वाढत चाललंय. अजून ऊस जायचा तसाच राहिलाय. ऊस घालवण्यासाठी अनेक कारखान्यांच्या टोळ्यांकडे हेलपाटे मारले, त्यातून कशीतरी एक टोळी मिळाली,तर उसाचा फड बघितल्यानंतर टोळीवाल्यांनी सांगितलं की ऊस पेटवून द्या. मग आम्ही ऊस तोडतो काहीही करून ऊस घालवणे गरजेचे आहे, त्यामुळं एकदम हिरवागार ऊस पेटवून दिलाय. ऊस पेटवून देऊनच्या देऊन टनामागे 220 रुपये तोडणी द्यायचं ठरलं आहे," ही व्यथा सांगितली उमरड (ता. करमाळा) येथील काशिनाथ देवकते  या शेतकऱ्याची.

साखर कारखान्याला ऊस घालवण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकर्यांची ही अवस्था सूरू झाली आहे. वर्षभर  काबाडकष्ट करून सांभाळलेले उसाचे हिरवेगार पीक  हातांनी पेटवून देताना  शेतक-याचं काळीज मात्र जळतंय याचे भान ना कारखानदारांना आहे ना ऊसतोड कामगार आहे. (farmers burning their fields so that sugarcane can be harvested.)

सध्या करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे.आजही करमाळा तालुक्यात आठ ते दहा लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे .गेल्या महिन्यात हा ऊस घालवण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. करमाळा तालुक्यातील श्री मकाई सह. साखर कारखाना, कमलाभवानी शुगर व भैरवनाथ शुगर या साखर कारखान्यांमार्फत ऊस गाळप सुरू आहे,तर आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे. (आदिनाथ विषयी जे काही सुरू आहे ते आपण सर्वजण पाहतो आहे.)

याशिवाय करमाळा तालुक्यातील ऊस अंबालिका शुगर ,बारामती अॅग्रो ,विठ्ठलराव शिंदे शुगर म्हैसगाव यासह साधारणपणे दहा ते बारा साखर कारखान्याला ऊस पाठवला जात आहे.

तरीही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक असल्याचे चित्र दिसते आहे .ऊस घालवण्यासाठी शेतकरी ऊसतोड कामगारांच्या पाठीमागे लागत असून आतापर्यंत साधारणपणे शंभर ते दीडशे रुपये टनाने ऊस तोडला जात होता. आता मात्र उसाच्या टोळ्या टनाला दोनशे ते अडीचशे रुपये मागू लागल्या आहेत .याशिवाय ऊस तोडणी उरकण्यासाठी ऊस तोडणी टोळ्यांकडून ऊस पेटवून देऊन तोडतो असे शेतकर्यांना सांगत आहे.ना इलाजाने शेतकरी ऊस पेटुन देत आहेत.

"माझा उमरड व विहाळ हद्दीत मिळून दहा एकर उस आहे उसाला पंधरा ते सोळा महिने झाले आहेत ऊस घालवण्यासाठी गेली दोन महिन्यांपासून आम्ही कारखान्याचे साहेब, टोळीवाले यांच्या पाठीमागे आहोत.मात्र आज येतो देतो करत टोळीला एवढे दिवस लागले आता ऊस तोडायला टोळी मिळाली आहे ,तरीही म्हणताहेत की तुम्ही ऊस पेटवून द्या मग आम्ही तोडतो .एवढय़ा आपुलकीने सांभाळली पिक पेटून देताना एक शेतकरी म्हणून खुप दु :ख होत आहे .पण आता आमच्यापुढे कुठलाच पर्याय उरला नसल्याने आम्ही दहाच्या दहा एकर ऊस पेटवून दिला आणि तो तोडून घेत आहोत'', असं काशिनाथ देवकते या शेतकऱ्यानं म्हटलं आहे.

ऊस पेटवून दिल्याने ऊस तोडणी उरकते-

ऊस तोड कामगार जर एका दिवसात एक एकर ऊस न पेटवता तोडत असतील तर पेटवून दिलेल्या ऊस ते दोन ते अडीच एकर ऊस एका दिवसाला तोडतात.

मात्र पेटवून दिलेला ऊस कारखान्याला घेऊन गेल्यानंतर कारखाना प्रत्येक टनामागे कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 500 रुपये कमी दिले जातात .कोणत्या कारखान्याने किती कमी पैसे द्यायचे ते त्याच्या मॅनेजमेन्टवर अवलंबून असते .

यामुळे शेतकर्यांच्या उसाचे वजनही घटते एकीकडं वजन घटते तर दुसरीकडे जळालेला ऊस असल्यामुळे भाव कमी दिला जातो असे दुहेरी नुकसान शेतकऱ्यांचे होते .

करमाळा तालुका ऊस स्थिती-

1. आपल्या तालुक्यातील एकूण उसाचे क्षेत्र : 35 लाख मेट्रिक टन

2. आतापर्यंत झालेले ऊस गाळप : 12 लाख 71 हजार 653 मे.टन

3. तालुक्यात शिल्लक ऊस :साधारणपणे 10 लाख मेट्रिक टन

4. तालुक्यातील एकूण कारखाने : 4( 1 कारखाना बंद आहे.)

5. तालुक्यातील एकूण साखर उत्पादन :11 लाख 91 हजार 700 क्विंटल

6. ऊस शिल्लक राहाण्याची आपल्या तालुक्यातील प्रमुख दोन कारणे

  • चार साखर कारखान्या पैकी श्री आदिनाथ सह साखर कारखाना बंद आहे.तालुक्यातील एकुण उसाचे श्रेञ लक्षात घेता तीन कारखान्याकडे संपुर्ण गाव होऊ शकत नाही.

  • तालुक्यातील कारखान्या पेक्षा बाहेरील अंबालिका शुगर, बारामती ऑग्रोचा भाव जास्त असल्याने या कारखान्याला उस देण्याकडे शेतक-यांचा कल तर मराठवाडय़ातुन स्वस्थता मिळणारा ऊस गाळपाकडे तालुक्यातील खाजगी कारखान्याची धडपड त्यामुळे तालुक्यातील ऊस शिल्लक जास्त राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com