सांगोला सुतगिरणीच्या निवडणुकीतून दिग्गजांची माघार; बिनविरोध निवडीसाठी वेधले सर्वांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Cooperative Yarn Mills Director post

सांगोला सुतगिरणीच्या निवडणुकीतून दिग्गजांची माघार; बिनविरोध निवडीसाठी वेधले सर्वांचे लक्ष

सांगोला : शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणूकीमध्ये आतापर्यंत माजी चेअरमनसह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात असले तरी निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची प्रथमच निवडणूक होत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या आग्रहाखातर आपल्या शिक्षिकी पेशाचा राजीनामा देऊन सूतगिरणीचे चेअरमन झालेले नानासाहेब यांनी या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. माजी चेअरमनसह इतर दिग्गजांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत आहेत. 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.  स्थापनेपासूनच शेतकरी सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतून दिग्गजांनी माघार घेतल्याने सहकारी सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध होणार की ? निवडणूक लागणार याबाबत चर्चा सुरू आहे.

सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या 81 आहे.

सलग 15 वर्षे सूत गिरणीचे चेअरमन राहिलेले नानासाहेब लिगाडे, माजी संचालक बाबुराव गायकवाड, शहाजीराव नलवडे, गोविंद जाधव, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, अंकुश येडगे या दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

विरोधकांच्या सहकार्य बिनविरोध होणार ?

या सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील यांची ही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षातही संचालक व चेअरमन पदासाठी काहीजण इच्छुक असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.