esakal | उजनी धरणग्रस्तांचा सवाल ! धरणाचे पाणी मराठवाड्याला मिळते, मग करमाळ्याला का नाही?

बोलून बातमी शोधा

Ujani Dam

उजनी धरणग्रस्तांचा सवाल ! धरणाचे पाणी मराठवाड्याला मिळते, मग करमाळ्याला का नाही?

sakal_logo
By
राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयाचे पाणी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बार्शी, सोलापूर आदी शहरे धरणग्रस्त नसतानाही मूळ धरणग्रस्तांना पाणी देण्याऐवजी या ठिकाणी पाणी पुरविले जाते. परंतु "धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी परिस्थिती उजनी जलाशयाजवळील करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची झाली आहे. तर दुसरीकडे उजनीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे. मग मराठवाड्याला पाणी जाऊ शकते तर हाकेच्या अंतरावर असलेल्या हक्काच्या गावांना पाणी का मिळू शकत नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

करमाळा तालुक्‍यातील एकूण 118 गावांपैकी उजनी लाभक्षेत्रातील मूळ धरणग्रस्त 38 गावांचे उजनीच्या पाण्याने नंदनवन झाले आहे. त्याचबरोबर कोळगाव लाभक्षेत्रात येणारी 10 गावे व दहीगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या 24 गावांचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. त्यामुळे तेथील शेती व पिण्याच्या पाण्याची भविष्यात टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता फार कमी प्रमाणात आहे. परंतु, करमाळा तालुक्‍यातील उर्वरित 46 गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणी क्षमता असलेले उजनी धरण हाकेच्या अंतरावर असतानाही येथील शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा: पंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला ! नागरिकांकडून नियमांची ऐशीतैशी

मागील अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यावर उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी या गावांमधून होत आहे. तसे प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवले. पण उजनी धरणातील पाणी वाटप संपल्याचे कारण देण्यात आले. मग उजनी धरणातील पाणी वाटप संपले असताना इंदापूर तालुक्‍याला सांडपाणी म्हणून पाच टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला जात आहे. राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने त्याला नुकतीच मंजुरीही मिळाली आहे. मग करमाळा तालुक्‍यातील दुष्काळी गावांसाठी उजनीतील मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी का मिळू शकत नाही, असा सवाल मूळ धरणग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत.

पावसाळ्यात उजनी जलाशयाचा पाणीसाठा शंभर टक्‍क्‍यांवर भरूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. तसेच जलाशयाची 122 टीएमसी पाणी क्षमता असली तरी, जलाशयामध्ये आतापर्यंत 20 ते 22 टीएमसी एवढा गाळ जमा झालेला आहे, असे गृहीत धरून तेवढ्या क्षमतेचे पाणीही त्यात मोजले जाते. परंतु या गाळाविषयी कोणताही लोकप्रतिनिधी, नेते, पालकमंत्री, जलसंपदामंत्री, धरणग्रस्त संघटना मात्र मूग गिळून गप्प का आहेत, हाही सवाल आहेच.

हेही वाचा: Video : नव्वदी पार केलेल्या आजीने केली कोरोनावर मात अन्‌ कोराईगड केला काबीज !

प्रमुख मागणी

  • कुकडी कॅनॉल झाल्यापासून कधीच पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने कुकडी प्रकल्पामधून करमाळा तालुका वगळून उजनी प्रकल्पात समावेश करावा

  • कुकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्‍यासाठी असणारे पाणी भीमा नदीतून उजनी धरणात सोडावे

  • तालुक्‍यातील कुकडीच्या पाणी वितरण वाहिन्या उजनी विभागाकडे हस्तांतरित कराव्यात. त्याद्वारे पाणी वाटप करावे. त्यामुळे उपसा सिंचन योजना कमी खर्चात कार्यान्वित होईल