esakal | (Video) नव्वदी पार केलेल्या आजीने केली कोरोनावर मात अन्‌ कोराईगड केला काबीज !

बोलून बातमी शोधा

Aaji
Video : नव्वदी पार केलेल्या आजीने केली कोरोनावर मात अन्‌ कोराईगड केला काबीज !
sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतले आणि संतुलित आहारासह प्राणायाम केला तर कोरोनावर यशस्वी मात करता येते. कोरोनामुक्त होऊन पूर्वीच्याच उत्साहाने काम करत असलेली अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. वयाची नव्वदी ओलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजीचं उदाहरण देखील असंच प्रेरणादायी आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केलीच परंतु समुद्रसपाटीपासून तब्बल 3050 फूट उंच असलेला कोराईगड चढून तिथे आपल्या निरोगी आरोग्याचा झेंडा फडकावला. जणू कोरोनाला घाबरू नका, योग्य उपचार घेऊन नियमांचे पालन करा आणि पुढील आयुष्यातील गड जिद्दीने काबीज करा, असाच संदेश या आजीने दिला आहे.

वयाची नव्वदी ओलांडलेल्या दमयंती भिंगे या पंढरपूर अर्बन बॅंकेतील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी सुधीर भिंगे आणि व्यापारी कमिटीचे सचिव इसाप्पा भिंगे यांच्या आई. त्यांना वर्षानुवर्षे कोणताही आजार नव्हता. ना ब्लडप्रेशर, ना डायबिटीस. घरकामात कायम व्यस्त असणाऱ्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आजीला काही महिन्यांपूर्वी कोरोनाने गाठले. घरची सारी मंडळी घाबरून गेली. परंतु आलेल्या संकटाला धैर्याने तोंड द्यायचे, असा स्वभाव असलेल्या आजी बिलकुल घाबरल्या नाहीत. उलट आपल्याला काही होणार नाही, आयुष्यात अशा अनेक संकटांना धैर्याने तोंड देत आले आहे. कोरोनावर नक्कीच विजय मिळवीन, असे सांगून त्यांनीच घरातील लोकांना धीर दिला.

डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आजीला पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. आठ- दहा दिवसांनी त्यांना घरी आणून विलगीकरणात ठेवण्यात आले. कोरोनाचा त्यांनी बाऊ केला नाही. धार्मिक पुस्तके वाचण्याची आवड असलेल्या आजीने विलगीकरणातील वेळ अशी पुस्तके वाचण्यात आनंदात घालवला. त्यामुळे विलगीकरणातील दिवस केव्हा संपले, हे त्यांना देखील समजले नाही. विलगीकरणानंतर आजी घरात पुन्हा पूर्वीसारख्या कार्यरत झाल्या.

हेही वाचा: "करमाळा बाजार समितीच्या प्लॉटचे केले सभापती प्रा. बंडगर यांनी बेकायदेशीर वाटप !'

आजीने चढला कोराईगड !

कोरोनावर मात केल्यानंतर ही आजी दोन महिन्यांनी चक्क नातवंडांसह लोणावळा येथे फिरायल्या गेल्या. नातवंडांनी जवळच असलेला कोराईगड चढण्याचा प्लॅन केला. आजीला गड चढता येणार नाही, या विचाराने त्यांचा नातू अभिजित ऊर्फ भैय्या याने "आजी आम्ही कोराईगडावर जाणार आहोत. तुला गड चढायला येणार नाही, तू येऊ नकोस' असे सांगितले. परंतु, आजी कुठल्या ऐकतात ! त्या म्हणाल्या, "पोरांनो, मला काही त्रास होत नाही, मी पण तुमच्या सोबत गडावर येणार.' आणि मग नातवंडांचा नाइलाज झाला. उत्साही आजीला सोबत घेऊन नातवंडांनी गड काबीज करायचे ठरवले आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या आजीने नातवंडांच्या समवेत झपझप पावले टाकत मोठ्या जिद्दीने गड सर देखील केला.

हेही वाचा: मृत आजीचं अख्खं कुटुंब क्वारंटाइन ! खाकी वर्दी आली धावून अन्‌ केला अंत्यविधी

कोरोनामुक्त होऊन पूर्वीप्रमाणेच उत्साही आणि आनंदी जीवन जगत असलेली भिंगे आजीसारखी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. परंतु, त्याविषयी आपल्याला माहितीच नसते. सध्याच्या परिस्थितीत भिंगे आजीसारख्या व्यक्तींची उदाहरणे निश्‍चितच प्रेरणादायी ठरणारी आहेत.

भिंगे आजी म्हणतात...

  • कोरोनाविषयी अनावश्‍यक भीती उराशी बाळगू नका

  • आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

  • विनाकारण मनावरील दडपण वाढवू नका

  • विलगीकरणातील वेळात धार्मिक पुस्तके वाचा

  • डॉक्‍टरांच्या सूचनांचे पालन करून कोरोनामुक्त व्हा