
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील नदीकाठचा भाग वगळता 80 टक्के भाग हा दुष्काळी पट्ट्यात येत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतातील उभी पिके जतन करण्यासाठी बोअर पाडण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे बोअरला पाणी लागण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. परिणामी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला आहे.
भीमा नदीकाठी असलेली पिके जतन करण्यासाठी थेट नदीपात्रातून पाइपलाइन करून पाणी देण्यात आले आहे. नदीकाठ वगळता उर्वरित काही गावांत उजनी उजव्या कालव्याचे पाणी आले. कालवा क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी लांबणीवर पडल्यास बोअर घेण्याशिवाय पर्याय नाही. याशिवाय भाळवणी, निंबोणी, चिक्कलगी, मारोळी, सलगर खुर्द, सलगर बुद्रूक, आसबेवाडी, जंगलगी, हुलजंती, लोणार, पडोळकरवाडी, रेड्डे, भोसे, नंदेश्वर, पाटकळ, जालिहाळ, हाजापूर, शिरशी, गोणेवाडी, लेंडवेचिंचाळे, शिरनांदगी, ममदाबाद, हुन्नूर, मानेवाडी, लवंगी, बावची, पौट, जित्ती या भागातील शेतकऱ्यांची शेती हंगामी बागायती स्वरूपाची आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर या भागात शेती केली जात असताना, अलीकडच्या काळामध्ये डाळिंब व द्राक्ष पिकाच्या रूपाने बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले फळपीक जतन करण्यासाठी बोअर घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यासाठी हजार फुटांपर्यंत बोअर घेण्याची मानसिकता या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.
असे आहेत बोअर पाडण्यासाठीचे दर
सध्या डिझेलचा दर वाढल्यामुळे बोअर खोदायचा दर देखील वाढला आहे. 40 रुपये फूट असणारा दर आता 70 रुपयांपर्यंत गेला आहे. 300 फुटांपर्यंत दर हा 70 रुपये आहे. 300 ते 400 पर्यंत 75 रुपये म्हणजेच पाच रुपयांची वाढ करण्यात आली. चारशे ते पाचशे फुटांपर्यंतचा दर 80 रुपये आहे. सातशे फुटांपर्यंत 95 रुपये दर आहे व सातशे फुटांच्या खाली 105 रुपये प्रतिफूट असा दर आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे दक्षिण भागामध्ये एक बोअर घेण्यासाठी एक लाख रुपयांची तयारी करावी लागत आहे. यामध्ये सोडण्यात आलेली मोटार काही कारणास्तव जर त्यात अडकली तर नव्याने पुन्हा एक लाख रुपयांची तजवीज करावी लागत आहे. हे सर्व या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबर व फळपीक जतन करण्यासाठी करावे लागत आहे.
शिरनांदगी मध्यम प्रकल्पामुळे त्याचा फायदा लगतच्या चिक्कलगीपर्यंत होतो. परंतु पडोळकरवाडीचा मध्यम प्रकल्प न भरल्यामुळे लोणार, मारोळी, लवंगी, सलगर खुर्द, सलगर बुद्रूक आसबेवाडी या शेतकऱ्यांचे मात्र बोअर घेण्यासाठी लाखो रुपये पाण्यात चालले आहेत. तमिळनाडू येथील बोअर पाडण्याची मशिनरी तालुक्यामध्ये ठाण मांडून आहेत. दरवर्षी साधारणतः 22 ते 25 मशिन असतात तर सध्या दहा ते बारा मशिन्स तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. पुढील महिन्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी येथील शेतकऱ्यांची झाली आहे. प्रसंगी सावकार आणि बॅंकांचे उंबरठे देखील झिजवण्याची तयारी करावी लागणार आहे. परंतु पाणी न लागल्यास ते कर्ज तसेच राहते. त्यासाठी शासनाच्या कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने हा लाखो रुपयांचा भुर्दंड वाचवण्यासाठी या गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची सुविधा करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्याचा परिणाम अल्प दिसून आला असला तरी कायमस्वरूपी परिणाम दिसण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या उपसा सिंचन योजनेला गती देण्याची आवश्यकता आहे.
हातातोंडाशी आलेले पीक जतन करण्यासाठी शेतीतील पाणी संपुष्टात आल्यावर बोअर घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात आणि ते केल्याशिवाय पीक हातात येत नाही. उघड्या डोळ्यांनी सुटलेले पीक बघवत नाही. त्यामुळे वाट्टेल ते करावे लागते.
- गिरीश पाटील,
शेतकरी, मारोळी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.