
शेतकऱ्यांना मिळणार एकरी ३० हजारांचे भाडे! दिवसा वीजेसाठी महावितरण बसवणार सौरपॅनल
सोलापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी आता शासकीय व खासगी जमिनींवर महावितरणच्या वतीने सौर पॅनेल बसविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० टक्के फीडरवर ते पॅनेल बसतील. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन लागेल, त्यांना दरवर्षी एकरी ३० हजार रुपयांचे भाडे दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ८६ ठिकाणची अठराशे एकर शासकीय तर ६० ठिकाणची शेतकऱ्यांची ९४६ एकर जमीन लागणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
जिल्ह्यात तीन लाख ७४ हजार कृषिपंपाचे ग्राहक आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तासांतील केवळ आठ तासच वीज मिळते. रात्री-अपरात्री त्यांना शेतात जावे लागते. मागील कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांना पाणी द्यायला रात्री शेतात जातो. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असून, त्यासाठी कृती आराखडाच तयार केला आहे. राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिवसा वीज दिली जाणार आहे. त्यासाठी शासकीय व खासगी जमिनींवर सोलर पॅनेल बसवून त्यातून वीज तयार केली जाणार आहे. सौरऊर्जेतून निर्माण होणारी संपूर्ण वीज शेतीसाठी दिली जाणार आहे. पुढील टप्प्यात पुन्हा ३० ते ५० टक्के फीडरवर सौर पॅनेल बसविले जाणार असून आगामी तीन वर्षांत सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव; निर्णयानंतर कार्यवाही
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ८६ पैकी ५६ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शासकीय जमिनींची जागा निश्चित केली आहे. तसेच गरजेच्या ठिकाणी शासकीय जमिनी नसल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. सुरवातीला शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपयांचे भाडे दिले जाणार असून, दरवर्षी त्यात वाढ केली जाणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिला असून, त्यांच्या निणर्यानंतर सौर पॅनेल बसविण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्यासंबंधीची निविदा निघाल्याची माहिती अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे नियोजन
शेतकऱ्यांना दिवसा पुरेशा प्रमाणात वीज मिळावी, यासाठी ‘महावितरण’च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० टक्के फीडरवर सौर पॅनेल बसविले जाणार आहेत. जमिनींचा सर्व्हे झाला असून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. काही महिन्यांत सौर पॅनेल बसविल्यानंतर त्या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण