esakal | कडक लॉकडाउनचा सोलापुरात बळी ! खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide

कडक लॉकडाउनचा सोलापुरात बळी ! खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर (सोलापूर) : लॉकडाउन काळात पगार वेळेत मिळत नव्हता. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच पत्नीच्या प्रसूतीचा खर्च भागविणे कठीण बनले होते. त्या वेळी पती किशोर चव्हाण यांनी पाच जणांकडून व्याजाने पैसे घेतले. मात्र, कडक लॉकडाउनमुळे त्याची परतफेड करता येत नसल्याचे किशोर यांनी संबंधित खासगी सावकारांना सांगितले. तरीही त्यांनी पतीला त्रास दिला आणि त्याला कंटाळून किशोर चव्हाण यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद किशोर चव्हाण यांची पत्नी पायल चव्हाण (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली.

कडक लॉकडाउनमुळे किशोर चव्हाण यांनी कुटुंबातील समस्या सोडविण्यासाठी पाच जणांकडून 59 हजार रुपये 15 ते 20 टक्‍के दराने घेतले. किरण चव्हाण व राजेश काळे यांच्याकडून प्रत्येकी 15 हजार रुपये तर नर्मदा काळे आणि अनिकेत गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच महेश मुरलीधर काळे याच्याकडून नऊ हजार रुपये व्याजाने घेतले. हा व्यवहार 23 फेब्रुवारी ते 22 एप्रिल या काळात झाला. पैशाचे व्याज व मुद्दल मागण्यासाठी त्यांनी किशोर चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. आता लॉकडाउन आहे, काही दिवसांनी पैसे देतो, असे किशोरने त्यांना सांगितले. तरीही त्यांनी त्रास द्यायला सुरवात केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पालकमंत्री खोटे बोलले? "उजनी'तूनच द्यावे लागणार इंदापूरला पाच टीएमसी पाणी

त्यामध्ये किरण चव्हाण, नर्मदा काळे, राजेश काळे, महेश काळे (सर्वजण रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक) आणि अनिकेत गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन) यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वर्धन पुढील तपास करीत आहेत.

मागील कोरोना लॉकडाउनच्या काळात सुद्धा सोलापुरात खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या. तर पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र कक्ष उभारून तक्रारी करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्या वेळी अनेक खासगी सावकारांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता पुन्हा तोच प्रकार समोर येत आहे.

loading image