esakal | पालकमंत्री खोटे बोलले? "उजनी'तूनच द्यावे लागणार इंदापूरला पाच टीएमसी पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani_Bharne

पालकमंत्री खोटे बोलले? "उजनी'तूनच द्यावे लागणार इंदापूरला पाच टीएमसी पाणी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुळा-मुठातून 25 ते 30 टीएमसी पाणी उजनी धरणात येते. धरणात जमा होणाऱ्या या सांडपाण्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धरणात कितीही पाणीसाठा असला, तरीही दरवर्षी तेवढे पाणी उचललेच जाणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतीसाठी उजनी धरण वरदान ठरले आहे. 117 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाचे काम 1969 रोजी सुरू झाले. जून 1980 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. धरण होताना इंदापूर तालुक्‍यातील 28 गावे धरणात गेली तर पाच गावे बाधित झाली. धरणासाठी करमाळा तालुक्‍यातील 21 गावांनाही स्थलांतरित व्हावे लागले. त्यापैकी बहुतांश गावांमधील शेतीला पुरेसे तथा पाणीच मिळत नसल्याची स्थिती आहे. आता सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतेक तालुक्‍यांतील शेतीला उजनी धरण वरदान ठरत आहे. उजनीतील पाण्यामुळे रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी वाढली आणि सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली. तरीही मागील 41 वर्षांत अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यातील बऱ्याच शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळू शकलेले नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हेही वाचा: ""सांडपाणी' या शब्दाचा खेळ करून "उजनी'तून पाणी उचलण्याचा घाट !'

दोन्ही अधीक्षक अभियंत्यांचे तोंडावर बोट

पाटबंधारे विभागातील सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व जयंत शिंदे यांना उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी दिले जाणार आहे का, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी त्यावर बोलण्यास नकार देत पुणे पाटबंधारे कालवा मंडळाकडे बोट दाखविले.

काय आहे नेमके प्रकरण?

उजनी धरणातील 117 टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन यापूर्वीच झाले आहे. धरण क्षेत्रात पाऊस नाही झाला, तरीही मुळा- मुठा नदीतून धरणात सरासरी 25 ते 30 टीएमसी पाणी दरवर्षी जमा होते. या सांडपाण्यातील पाच टीएमसी पाणी खडकवासला व नीरा डावा कालव्यावरील इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना दिले जाणार आहे. त्या गावांसाठी आता शेटफळकडे उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली जाणार आहे. धरणात पाणी जमा झाल्यानंतर खडकवासला कालव्यातून त्या गावांना पुरविले जाणार आहे. या उपसा सिंचन योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला असून 10 किलोमीटर लांबी असून त्याला तात्पुरती मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर धरणात जमा झालेले मुळा- मुठा नदीतील पाणी त्या 22 गावांना दिले जाणार आहे. मात्र, पाऊस कमी अथवा धरण 100 टक्‍के भरले नाही, तरीही ते पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी द्यावेच लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.

loading image