शेतीला उजनीतून ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत पहिले तर १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत दुसरे आवर्तन; फेब्रुवारीअखेर धरण -२७.९० टक्के होणार

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत २९ फेब्रुवारीपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. शेतीसाठी पहिले आवर्तन ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत तर दुसरे आवर्तन १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत २९ फेब्रुवारीपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. शेतीसाठी पहिले आवर्तन ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत तर दुसरे आवर्तन १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. दृश्यप्रणालीव्दारे (व्हीसी) आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी संचालक श्री. कोल्हे, उजनी धरण व्यवस्थापन प्रकल्पाचे श्री. मोरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे आदी उपस्थित होते.

वीज पुरवठा होणार खंडीत

जलसंपदा विभागाने रब्बी हंगाम २०२३-२४ व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी प्रकल्पातून ४ नोव्हेंबरपासून पाणी सोडणेबाबत नियोजन केले आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे पाणी सोडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वीज खंडित करावी, जेणेकरून शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोचेल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

धरणातील पाण्याचे नियोजन...

  • धरणाच्या वरच्या बाजूला बाष्पीभवनातून २.६६ टीएमसी, उपसा सिंचनसाठी १.७२, पिण्यासाठी ०.८३, जलाशय बिगर सिंचन औद्योगिक ०.५८, जलाशयातील गाळ २.२६, सीना माढा उपसा सिंचन योजना आवर्तन एक व दोन २.८४ टीएमसी, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून दोन्ही आवर्तन १.०३ टीएमसी, असा एकूण ११.९२ टीएमसी पाणी वापराचे २९ फेब्रुवारीपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.

  • धरणाच्या खालच्या बाजूला कालव्यातून पहिले आवर्तन : (मान नदीवरील सात कोल्हापूर बंधारे व सीना नदीवरील नऊ कोल्हापूर बंधाऱ्याच्या फीडिंगसह) कालावधी ४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत आठ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सिंचन आवर्तन दुसरे : १ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारीपर्यंत ७ टीएमसी पाणी सोडण्यात येईल.

  • भीमा सीना जोड कालव्यातून दोन आवर्तने ४ नोव्हेंबर ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ६.३५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. सोलापूर शहरासाठी १ ते १० डिसेंबर या कालावधीत ५ टीएमसी आणि भीमा नदीतून हिळ्ळी (कोल्हापूर पद्धतीचा बंधारा) पर्यंत १ ते १० फेब्रुवारीपर्यंत ६ टीएमसी पाणी सोडले जाईल.

फेब्रुवारीअखेर उजनी उणे २७.९० टक्के!

रब्बी हंगामात पाणी वापर ४४.२७ टीएमसीपर्यंत राहील, अशी माहिती अधीक्षक अभियंता साळी यांनी दिली. उर्वरित रब्बी हंगामाचे नियोजन झाल्यानंतर २९ फेब्रुवारीअखेर प्रकल्पाची पाणी पातळी ४८.७२ टीएमसी असेल. धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १४.९५ टीएमसी (२७.९० टक्के) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com