Postal Voting
Postal Voting

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 80 वर्षांपुढील मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय

पंढरपूर (सोलापूर) : कोव्हिड रुग्ण, दिव्यांग आणि 80 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना यंदा प्रथमच टपालाद्वारे देखील मतदान करता येणार आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाने ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, याचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. टपाली मतदान पोलिस बंदोबस्तात व्हिडिओ चित्रीकरण करून केले जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

निवडणूक आयोगाने प्रथमच 80 वर्षांपुढील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याची कार्यवाही पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत केली जाणार आहे. दिव्यांग आणि कोव्हिड रुग्णांनाही टपाली मतदान करता येणार आहे. अशा परिस्थितीत हे टपाली मतदान म्हणजे आपले हक्काचे मतदान, असा काही राजकीय मंडळींचा समज होऊ शकतो. कोव्हिड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षांच्या पुढील लोकांच्या घरी जाऊन दबाव अथवा आमिष दाखवले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु अशा पद्धतीने मते आपल्या पारड्यात टाकून घेणे कोणालाही सहजासहजी शक्‍य होणार नाही. असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. टपाली मतदान सुविधेचा कोणाकडूनही दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. 

या संदर्भात श्री. गुरव यांना विचारले असता ते म्हणाले, जे मतदार ऐंशी वर्षांच्या पुढील आहेत त्यांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधीने तहसील कचेरी, प्रांत कार्यालयाशी संपर्क साधून 12 डी फार्म घेऊन तो आवश्‍यक कागदपत्रांसह वेळेत दाखल करणे गरजेचे आहे. प्राप्त झालेल्या कागदपत्रांची तपासणी करून एक अधिकारी, एक सहाय्यक अधिकारी, एक पोलिस कर्मचारी मतपेटीसह संबंधित व्यक्तीच्या घरी जातील. तिथे संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याचे गुप्त मत पेटीमध्ये टाकले जाईल. या सर्व व्यवस्थेचे व्हिडिओ चित्रण केले जाणार आहे. अशा पद्धतीने दररोज किती मतदारांनी टपाली मतदान केले याची दररोज नोंद ठेवली जाणार असून, मतपेटी सील केलेली असेल. 

श्री. गुरव म्हणाले, निवडणूक आयोगाकडून प्रथमच अशा पद्धतीची सुविधा दिली जात असून, अद्याप त्याच्या अंमलबजावणी विषयी सविस्तर सूचना मिळालेल्या नाहीत. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने त्याच्या किती दिवस आधीपर्यंत टपाली मतदानासाठी अर्ज दाखल करता येईल आणि अन्य तपशील प्राप्त झालेला नाही. त्याविषयी सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. 

सैनिकांसाठी "ईटीपीबी' चा वापर 
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी मतदारसंघात तब्बल 12 हजार 668 मतदार हे ऐंशी वर्षांच्या पुढील आहेत. याशिवाय 1 हजार 782 मतदार दिव्यांग असून 549 सैनिक मतदार आहेत. सैनिकांसाठी इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेबल पोस्टल बॅलेट (ईटीपीबी) चा वापर केला जाणार आहे; जेणेकरून सैनिकांना लवकरात लवकर मतपत्रिका उपलब्ध होऊ शकतील. 

कोरोना रुग्णांनाही सुविधा 
ऐंशी वर्षांच्या पुढील नागरिक बहुदा आजारी असतात किंवा त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाणे त्रासाचे वाटते. त्यामुळे मनात असून देखील अशी मंडळी मतदानासाठी मतदान केंद्रावर जात नाहीत. दिव्यांगांना देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे गैरसोयीचे वाटते. सद्य:परिस्थितीत कोरोनामुळे अनेक जण दवाखान्यात तर काही जण आयसोलेशनमध्ये आहेत. अशा सर्वांना टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com