esakal | "उजनी धरणाची उंची अगोदर दोन मीटरने वाढवा, मगच इंदापूरला पाणी न्या!'

बोलून बातमी शोधा

Rajan Patil
"उजनी धरणाची उंची अगोदर दोन मीटरने वाढवा, मगच इंदापूरला पाणी न्या!'
sakal_logo
By
भीमाशंकर राशीनकर

अनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी उजनी (Ujani Dam). धरणातून पाच टीएमसी सांडपाणी हा खोटा शब्दप्रयोग वापरून इंदापूरला नेण्याचा आदेश राज्य सरकारने काढलेला आहे. पण हे सर्व सांडपाणी दौंडपर्यंतचे शेतकरीच उचलतात. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल असून सोलापूर जिल्ह्यावर (Solapur District) हा मोठा अन्याय झालेला आहे. हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील. यासाठी आंदोलनही करण्यात येईल. असा इशारा लोकनेते साखर कारखान्यावर पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार राजन पाटील (Former MLA Rajan Patil) यांनी राज्य सरकारला दिला. (Former MLA Rajan Patil's advice to increase the height of Ujani dam by two meters)

1993 साली मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार उजनी धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास पाठीमागील जमिनीला कसलाही धोका न होता आणि कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन अधिगृहीत न होता 12 टीएमसी पाणी धरणात साठेल. यातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल व राहिलेले 7 टीएमसी अतिरिक्त पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळेल. या योजनेसाठी सरकारला जास्त खर्चही करावा लागणार नसल्याचे श्री. पाटील यांनी अभ्यासपूर्ण शैलीत मुद्दे मांडत सांगितले. सध्या पालकमंत्र्यांच्या या निर्णयावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात नाराजी व्यक्त केली असून, उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे. उजनीच्या पाण्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. याचा विसर राज्य सरकारला पडलेला आहे, असा घरचा आहेर राज्य सरकारला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांनी दिला.

हेही वाचा: पंढरपूर निवडणुकीची बातमी अन्‌ माने यांच्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही

उजनी धरणात पुणे परिसरातील जास्त झालेले पावसाचे पाणी पावसाळ्यात खाली सोडून द्यावे लागते. 1993 च्या शासन प्रस्तावानुसार धरणाची उंची दोन मीटरने वाढविल्यास कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली न जाता 12 टीएमसीचा अतिरिक्त पाणी साठा धरणात उपलब्ध होणार असून 5 टीएमसी पाणी इंदापूरला व 7 टीएमसी पाणी जिल्ह्याला मिळू शकेल. यासाठी मोठ्या निधीचीही आवश्‍यकता नसून त्यातून पाण्याचे एक आवर्तनही सोलापूर जिल्ह्याला मिळू शकेल. परंतु शासनाने अशाप्रकारची दिशाभूल करून पाणी पळविल्यास आमचा त्यास तीव्र विरोध असेल.

- राजन पाटील, माजी आमदार