esakal | पंढरपूर निवडणुकीची बातमी अन्‌ माने यांच्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही

बोलून बातमी शोधा

NCP
पंढरपूर निवडणुकीची बातमी अन्‌ माने यांच्याशी राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : "पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत साम- दाम- दंड- भेदचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लीगल सेलने (NCP Legal Cell) केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लीगल सेलचे ऍड. नितीन माने (Advocate Nitin Mane) यांनी याबाबतची मागणी केली आहे', अशा आशयाची बातमी प्रसार माध्यमातून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, ही बातमी साफ चुकीची असून, अशी कुठलीच मागणी राष्ट्रवादी लीगल सेलने केली नाही. ऍड. नितीन माने यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलशी काहीएक संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादी लीगल सेलचे राज्य अध्यक्ष ऍड. आशिष देशमुख (Advocate Ashish Deshmukh) (पुसद, जिल्हा यवतमाळ) यांनी "ई-सकाळ'शी बोलताना केला आहे. (NCP Legal cell reveals false news about Pandharpur by-election)

प्रसार माध्यमात व्हायरल होत असलेल्या बातमीत स्वत:ला राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलचे ऍड. नितीन माने यांनी आरोप केले आहेत, की विधान परिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले. त्यामुळे धमक्‍या देण्याचा संशय निर्माण होत असून, त्या संदर्भातील काही मागण्या त्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा: मंगळवेढा शहरातील मताधिक्‍यच ठरले आवताडेंना आमदार होण्यास कारणीभूत !

त्यात प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन्ही कारखानाच्या तसेच कार्यालयाच्या आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावेत. समाधान आवताडे यांच्या कन्स्ट्रक्‍शन कंपनीचा पूर्ण ऑडिट तपासावा. नवडणुकी दरम्यान दोन्ही सदस्यांच्या प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या सर्व बॅंक खात्यांची चौकशी करावी. माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करावी. समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घ्यावी. अशा मागण्या केल्या आहेत. तसेच याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयोगासह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, सोलापूर जिल्हाधिकारी, पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही पत्र पाठवल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा ! भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान

'त्या ऍड. नितीन मानेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी काहीही संबंध नाही

या प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. आशिष देशमुख म्हणाले, मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष किंवा लीगल सेलशी ऍड. नितीन माने यांचा काडीचाही संबंध नाही. हा माणूस फार विचित्र आहे. जो पक्ष सत्तेत येईल त्याचा लेटर पॅड छापतो व स्वत:च्या नावाने पदाधिकारी असल्याचे दाखवतो. एका प्रसिद्धी माध्यमातून त्याने पंढरपूरची पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली. त्या प्रसिद्धी माध्यमाचा स्थानिक पत्रकार त्याचा मित्र असू शकतो कदाचित. प्रत्यक्षात या माणसाचा राष्ट्रवादी लीगल सेलशी काहीएक संबंध नाही. त्याबाबत एक प्रसिद्धिपत्रक टाकणार आहे. राष्ट्रवादीशी ऍड. नितीन माने नावाच्या माणसाचे काही देणे- घेणे नाही व पंढरपूरची फेरनिवडणुकीची मागणी आम्ही केली नाही.