भुईकोट किल्ला व कमलाभवानी मंदिर म्हणजे करमाळ्याचा ऐतिहासिक वारसा ! जतन केल्यास पर्यटनवाढीला चालना

KarmalaGP
KarmalaGP

करमाळा (सोलापूर) : येथील भुईकोट किल्ला, कमलाभवानी मंदिर व रावरंभा निंबाळकर यांचा ऐतिहासिक वारसा यामुळे करमाळ्याची ओळख राज्यभर आहे. राजे रावरंभा यांनी बांधलेल्या येथील भुइकोट किल्ल्याची झालेली पडझड आणि लोकांचे होत असलेले अतिक्रमण यामुळे किल्ला दुर्लक्षित झाला आहे. करमाळ्याचा हा ऐतिहासिक वारसा जपला तर करमाळा हे पर्यटनाच्या नकाशावर आपले नाव अधिक ठळकपणे नोंदवल्याशिवाय राहणार नाही. 

छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या. तर स्वातंत्र्यापर्यंत मराठ्यांचा शत्रू हैदराबादचा निजाम राहिला. या निजामाकडे मुख्य जहागीरदार असणाऱ्या रावरंभा निंबाळकरांनीच या आगळ्यावेगळ्या भुईकोट किल्ल्याची व कमलाभवानी मंदिराची उभारणी केलेली आहे. या घराण्याचा मूळ पुरुष रंभाजी बाजी नाईक-निंबाळकर असून ते फलटणच्या महादजी नाईक- निंबाळकरांचे नातू होते. निजामाने त्यांना पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर, माढा, करमाळा, भूम आदी ठिकाणच्या जहागिऱ्या दिलेल्या होत्या. 

राव रंभाराव व त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी 1727 -1730 च्या दरम्यान करमाळा किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. करमाळ्याचा हा किल्ला भुईकोट असल्याने पूर्णपणे खंदकाने वेढलेला होता, आता त्यावर रस्ता बांधलेला आहे. रस्त्याने किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश होतो. स्थानिक लोक याला वेस या नावाने ओळखतात. समोरच काळ्या मारुतीचे मंदिर आहे. मंदिराजवळ वीरगळ आणि सतीशिळा आपले लक्ष वेधून घेतात. तिथूनच उजव्या बाजूला खोलेश्वर मंदिर पाहावयास मिळते. मंदिराजवळ भग्न झालेल्या वीरगळी आहेत. 

मंदिराच्या मागील बाजूस पुष्कर्णी आहे, पण ती पाहण्यासाठी पुन्हा वेशीतून बाहेर येऊन डाव्या बाजूला जावे लागते. पुष्कर्णीच्या भिंतींवर नक्षीदार कोनाडे आहेत. एकेकाळी या कोनाड्यात मूर्ती असाव्यात पण आज ते रिकामे आहेत. पुष्कर्णी पाहून परत वेशीतून आत आल्यावर मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार दगडात बांधलेले असून त्याचा वरचा भाग विटांनी बांधलेला आहे. त्यात तीन झरोके आहेत. 

प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्यावरील लोखंडी खिळे आजही शाबूत आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस दरवाजाच्या वर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजावरून सध्या किल्ल्यातच वसलेले गाव आणि पसरलेली तटबंदी आणि बुरुज दिसतात. या गावाच्या वाढीमुळे किल्ल्याचे अवशेष लुप्त झाले किंवा नष्ट झालेले आहेत. 

दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला चालत गेल्यावर बांधिव तलाव आहे. तलावात दोन बाजूने उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात तलावाच्या काठावर जमिनीखाली बांधलेल्या या महालामुळे थंडावा मिळत असे. 

राजघराण्यातील लोक या ठिकाणी विश्रांतीसाठी आणि स्नानासाठी येत असत. या महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भूमिगत रस्ता आहे. तलाव पाहून पक्‍क्‍या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर कोर्टाची इमारत व इतर सरकारी कार्यालये आहेत. या ठिकाणी जानोजीरावांचा महाल होता. महाल आयताकृती असून मध्यभागी मोठे अंगण आहे. अंगणात विहीर आहे. महालाच्या मागच्या बाजूस बाहेर जाण्यासाठी एक छोटा दरवाजा ठेवलेला आहे. महाल पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी पोचतो. या ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. त्याकाळी बाहेरील तटबंदीतही दरवाजा असावा. आज मात्र त्याचा मागामूस दिसत नाही. 

दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर खंदकातील विहिरीपाशी पोचतो. किल्ल्यात वस्ती आणि अस्वच्छता असल्याने बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहण्यासाठी तटबंदी व बुरुजावरून फिरावे लागते. किल्ल्याला 18 बुरुज असल्याचा संदर्भ सापडतो. अनेक ठिकाणी तटबंदी उद्‌ध्वस्त झालेली आहे. किल्ला पूर्ण पाहायला अर्धा- पाऊण तास पुरेसा आहे. 

कमालाभवानी मंदिर 
करमाळा शहरातून व किल्ल्याच्या बुरुजांवरून पूर्वेला दिसणारे उंच कळस (गोपुरे) लक्ष वेधून घेतात. गावापासून दोन किलोमीटरवर उंच टेकडीवर कमलाभवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरामुळेच या गावाला श्रीदेवीचामाळ हे नाव पडले आहे. मंदिर सुंदर असून चोहोबाजूंनी गोपुरांची रचना आहे. आत प्रवेश केल्यावर 80 फूट उंचीचा तीन उंच दीपमाळा लक्ष वेधून घेतात. सध्या नगरपरिषदेकडून कर्जत रोडकडील बाजूने किल्ल्याच्या बाजूने सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

शहाण्णव अंकाचे महत्त्व 
येथील 96 खांबी मंदिर, मंदिराच्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांमधील 96 कमानी, शिखरावरील 96 शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 96 हा अंक शहाण्णव कुळी मराठा समाजातील 96 कुळाशी संबंधित असून तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नाते जोडणारा आहे. 

कमलादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची बाब, ती म्हणजे "सैराट' चित्रपटानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेली "हत्ती बारव' 96 पायऱ्यांची विहीर ! मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनविलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. या बारवेवर हत्तीची मोट चालायची असे सांगितले जाते. 

करमाळा शहर व तालुक्‍यात ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण अनेक वास्तू आहेत. नव्या संशोधनातून ते समोर येत आहेत. या माध्यमातून करमाळा तालुक्‍याचा पर्यटनाच्या दृष्टीने आणखी मोठ्या प्रमाणावर विकास होणे गरजेचे आहे. त्यातून देशात तालुक्‍याची वेगळी ओळख तर होईलच पण तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. 
- जगदीश ओहोळ, 
व्याख्यते व इतिहास अभ्यासक, करमाळा 

करमाळा तालुक्‍यातील कमलाभवानी मंदिर व करमाळ्याचा भुईकोट किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून येथील भुईकोट किल्ल्याची झालेली दुरवस्था, ढासळलेले बुरूज पाहता हा किल्ला जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. हा किल्ला जतन केला तरी येणाऱ्या पिढीला तो बघता येईल. या भागातील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने कमलाभवानी मंदिर, करमाळ्याचा भुईकोट किल्ला यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. 
- जगदीश अगरवाल, 
अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन, करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com