चुलत भावाच्या खूनात चौघांना जन्मठेप! बहिणीचा जमिनीचा वाद मिटवल्याने झाडल्या गोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
चुलत भावाच्या खूनात चौघांना जन्मठेप! बहिणीचा जमिनीचा वाद मिटवल्याने झाडल्या गोळ्या

चुलत भावाच्या खूनात चौघांना जन्मठेप! बहिणीचा जमिनीचा वाद मिटवल्याने झाडल्या गोळ्या

सोलापूर : जमिनीच्या वादातून आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दिंडोरे बंधूंनी बंदुकीतील गोळ्या झाडून चुलत भाऊ मल्लिकार्जुन धोंडोप्पा दिंडोरे यांचा खून केला. तीन वर्षे पाच महिने चाललेल्या या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी बापू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे (वय २८), बसवराज महादेव दिंडोरे (वय ४९), सिद्धाराम महादेव दिंडोरे (वय ४८) व शिवानंद महादेव दिंडोरे (वय ५४) यांना दोषी धरले. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

बहिणीच्या (भागिरथी) हिश्याला येणारी जमीन देण्यास आरोपी दिंडोरे बंधूं टाळाटाळ करीत होते. त्यावेळी तो वाद मल्लिकार्जुन यांनी मिटविला. आमच्या संमतीशिवाय परस्पर का मिटविला याचा जाब विचारायला बापू उर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे, बसवराज महादेव दिंडोरे, सिद्धाराम महादेव दिंडोरे व शिवानंद महादेव हे १९ मार्च २०१७ रोजी मल्लिकार्जुन दिंडोरे यांच्याकडे गेले. त्यावेळी मल्लिकार्जुन हे आपल्या वस्तीवर भाऊ मधूकर व इतरांशी गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी बापू दिंडोरे याने चिडून मल्लिकार्जुन दिंडोरे, मधुकर धोंडोप्पा दिंडोरे यांच्या दिशेने बारा बोरच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. मल्लिकार्जुन दिंडोरे यांच्या डोक्यात, गळ्यावर व पोटावर गोळ्या लागल्या. जखमी आवस्थेत मल्लिकार्जुन यांना सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, २१ मार्च २०१७ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक इंद्रजित वर्धन यांनी या खूनाचा तपास केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्टपैरवी म्हणून शितल साळवे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. प्रदिपसिंग राजपूत यांनी जोरदार युक्तीवाद केला. तो युक्तीवाद व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने कारावास, तसेच मयताच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये द्यावेत, अशी शिक्षा ठोठावली. मदतीची रक्कम न दिल्यास एक वर्ष कारावास, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

साक्षीदार फितूर अन्‌ सरकारी वकिलांचे चातुर्य
दिंडोरे खून खटल्यात एकूण १४ साक्षीदार होते. त्यातील सहाजणांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यापूर्वी सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांनी चाचपणी केली. त्यावेळी ते फितूर होतील, असा अंदाज त्यांना आला. त्यामुळे ॲड. राजपूत यांनी त्या सहाजणांची न्यायालयात साक्षच नोंदविली नाही. पण, आरोपींना शिक्षा होण्यासाठी दोन साक्षीदार, शवविच्छेदन व फॉरेन्सिकचा अहवाल, डॉक्टर व बॅलेस्टिक एक्सपर्टची साक्ष, घटनास्थळावरील भौतिक पुरावे, पंचनामा हे पुरावे महत्त्वाचे ठरले. ॲड. राजपूत यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ८५ जणांना जन्मठेप झाली.

 • खून खटल्यातील ठळक मुद्दे
  - ३ वर्षे ५ महिने चालला खूनाचा खटला
  - चूलत बहिणीच्या हिश्याला येणाऱ्या जमिनीतून वाद
  - परस्पर वाद मिटवल्याच्या रागातून बंदुकीतून झाडल्या गोळ्या
  - सरकारी पक्षाची चलाखी अन्‌ आरोपींना लागली जन्मठेप
  - मयताच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख देण्याचे न्यायालयाचे आदेश

Web Title: Four Life Imprisonment In Cousins Death Shots Fired After Settling Sisters Land

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..