पोटनिवडणुकीची ड्यूटी करून शिक्षकाने घर गाठले, मात्र कोरोनाही सोबतच आला अन्‌ हसतं-खेळतं कुटुंब...

सांगोला तालुक्‍यातील घेरडी गावातील शिक्षकासह घरातील चार सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला
Mane Family
Mane FamilyCanva

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील घेरडी अंतर्गत असलेल्या जगधनेवस्ती येथे सहा सदस्य असलेल्या शिक्षकाचे हसते- खेळते कुटुंब... पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Pandharpur- Mangalvedha Assembly by-election) मतदान कर्मचारी म्हणून शिक्षकाने कर्तव्य पार पाडले... कर्तव्य निभावून घरी परतले, मात्र त्यांच्यासोबत कोरोनाही (Covid-19) घरात प्रवेश केला... अन्‌ हसत्या- खेळत्या घरातील चार सदस्यांचा सलग चार दिवस एकेक करत कोरोनाने बळी घेतला... (Four members of a family, including a teacher from Gherdi village in Sangola taluka, died due to corona)

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदान कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असताना सांगोला तालुक्‍यातील प्रमोद माने (Pramod Mane) या प्राथमिक शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. निवडणुकीच्या यशापयशाची चर्चा होत असताना एक हसते- खेळते कुटुंबच उद्‌ध्वस्त झाले आहे.

Mane Family
शनिवारी कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू ! ऍक्‍टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 19 हजार 565

जगधनेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक प्रमोद वसंतराव माने (वय 50) यांची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामी मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक झाली होती. 16 एप्रिल रोजी यासाठी त्यांना पंढरपूर येथे बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी 17 एप्रिल रोजी आसबेवाडी (ता. मंगळवेढा) येथे निवडणूक कर्मचारी म्हणून सकाळी सात ते सायंकाळी सात असे सलग बारा तास कर्तव्य पार पाडले.

17 एप्रिल रोजी रात्री उशिरा निवडणुकीचे सर्व साहित्य पंढरपूर येथे जमा करून ते घरी परतले. मात्र घरी परतत असताना सोबत कोरोनाही आला होता. घरी परतल्यानंतर 19 एप्रिलपासून त्यांना त्रास सुरू झाला. सुरवातीला निवडणूक कामातील ताणतणावामुळे त्रास होत असेल असे वाटले. त्रास वाढू लागल्याने कोरोनावरील उपचारही लगेच सुरू केले. त्रास काही केल्या कमी होईना म्हणून त्यांना 25 एप्रिल रोजी सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने व मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावरही सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. डायबेटिसचा त्रास असलेल्या प्रमोद मानेंची प्रकृती बिघडत चालली.

Mane Family
इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

प्रमोद माने यांचे भाऊ प्रवीण व त्यांची पत्नी दोघेही डॉक्‍टर असून ते मुंबईत कार्यरत आहेत. त्यांचे बंधू डॉ. प्रवीण माने यांनी त्यांना उपचारासाठी 28 एप्रिल रोजी मुंबई येथे नेले. दुसऱ्याच दिवशी आई व वडील यांनाही उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले. मावशी जयश्री कोडग यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे वाटत असतानाच त्यांचाही त्रास वाढल्याने त्यांना 3 मे रोजी मुंबई येथे हलवण्यात आले. या सर्वांवर मुंबईत उपचार सुरू असताना प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने यांचा 4 मे रोजी मृत्यू झाला. 5 मे रोजी मावशी जयश्री कोडग (वय 68) यांचे निधन झाले. एकामागून एक दुःख पचवत असताना माने कुटुंबीयांवर दुःखाचे आघात होत होते. वडील वसंतराव माने (वय 75) यांचे 6 मे रोजी तर प्रमोदची आई शशिकला माने (वय 70) यांचे 7 मे रोजी निधन झाले.

बघता-बघता माने कुटुंबातील चार सदस्य सलग चार दिवस काळाच्या पडद्याआड निघून गेले. चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हसते- खेळते कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. प्रमोद माने यांची पत्नी गौरी व मुलगा ऋग्वेद (वय 12) यांनाही कोरोनाची लागण झाली होती; मात्र ते यातून बाहेर पडले आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. मात्र माने कुटुंबीयांचे घेरडी येथील घर कुलूप बंद असून तेथे नीरव शांतता आहे. माध्यमिक शिक्षक असणाऱ्या वसंतराव माने यांनी घेरडीसारख्या अति ग्रामीण भागात राहूनही आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. सर्वांत थोरला प्रमोद हा प्राथमिक शिक्षक होता. प्रशांत माने हा मधला मुलगा पालघर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता आहे. तर प्रवीण हा डॉक्‍टर असून त्याची पत्नीही डॉक्‍टर आहे. प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने हे उत्तम गायक व वादक होते. शिवाय उत्तम वक्ताही होते.

निवडणुकी दरम्यान कोरोना विस्फोट होणार, हे सर्वांना माहीत होते. निवडणूक कर्तव्यास नकार द्यावा तर कारवाईची भीती व कर्तव्य करावे तर कोरोनाचा राक्षस मानगुटीवर बसणार, हे ठाऊक असतानाही कारवाईच्या भीतीने शिक्षक या कामी कर्तव्यावर होते.

कोरोना उद्रेकाच्या काळातही प्रशासनाने शिक्षकांकडून निवडणुकीचे काम करवून घेतले आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उद्‌ध्वस्त झाले आहे. निवडणूक आयोग व शिक्षण संचालनालय यांच्याकडे अर्ज दाखल करून त्यांना कोव्हिड विमा संरक्षणाचा लाभ द्यावा, ही मागणी करणार आहोत.

- अमोगसिद्ध कोळी, सरचिटणीस, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com