esakal | 'भाजयुमो'च्या जिल्हाध्यक्षासह चौघे तडिपार! सोलापूर, इंदापूर, उस्मानाबादमध्ये प्रवेशबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Tadipar

खुनाचा प्रयत्न, धमकावणे, खंडणी मागणे, अवैध खासगी सावकारकी, घरफोडी, बेकायदेशीर जमाव जमविणे असे विविध गुन्हे दाखल असलेल्या चौघांना पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी तडिपार केले आहे.

'भाजयुमो'च्या जिल्हाध्यक्षासह चौघे तडिपार!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खुनाचा प्रयत्न, धमकावणे, खंडणी मागणे, अवैध खासगी सावकारकी, घरफोडी, बेकायदेशीर जमाव जमविणे असे विविध गुन्हे (Crime) दाखल असलेल्या चौघांना पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी तडिपार केले आहे. त्यामध्ये प्रकाश घोडके, मुकेश घोडके, बजरंग देविदास जाधव, गोविंद ऊर्फ बाळू जाधव यांचा समावेश आहे. त्यातील प्रकाश घोडके हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा (BJP) जिल्हाध्यक्ष असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: जॉब देतो, मुलांनाही सांभाळतो म्हणून विवाहितेवर अत्याचार !

शहरातील सामाजिक सुरक्षितता व शांततेला धोका निर्माण करणाऱ्यांना स्थानबद्ध अथवा तडिपार केले जाते. शहर पोलिस आयुक्‍तालयाने गुरुवारी चौघांना तडिपार तर एकाला स्थानबद्ध केले. शहरातील दमाणी नगरासह अन्य ठिकाणी संबंधितांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. प्रकाश घोडके व त्याचा भाऊ मुकेश घोडके यांच्यावर ही कारवाई झाली आहे. खुनाचा प्रयत्न, अवैध खासगी सावकारकी, अवैधरीत्या हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. दुसरीकडे, जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, बेकायदेशीररीत्या जमाव जमविणे, दंगल भडकावणे असे गुन्हे आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. तडिपार केलेल्यांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा आणि इंदापूर तालुक्‍यातून दोन वर्षांसाठी तडिपार केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: बुद्धिजीवी राहिले दूर ! राजकीय अस्तित्वासाठी ओबीसी मेळावा

हातभट्टी दारू व्यावसायिक बंडगर स्थानबद्ध

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्राम ऊर्फ सिद्धू संभाजी बंडगर (रा. आमराई, हौसे वस्ती) याला पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी (ता. 2) स्थानबद्ध केले. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फौजदार चावडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायात गुंतला आहे. कायद्याचे उल्लंघन करून बंडगर हा हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री करत असल्याबद्दल त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे आहेत. त्याच्यावर यापूर्वी कारवाई करूनही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. दारू वाहतूक करताना वाहन निष्काळजीपणे व हयगयीने चालवून लोकांच्या जीवितास व सामाजिक सुरक्षिततेला बाधा आणल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानबद्धतेची कारवाई करून सिद्राम बंडगर याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली आहे.

loading image
go to top