
Crime News : ऊस तोडणी साठी मजुर देतो म्हणून साडेनऊ लाख रुपये घेऊन एका ट्रॅक्टर मालकाची फसवणूक
मोहोळ : ऊस तोडणी साठी मजूर देतो असे सांगून, एका ऊस वाहतूक ठेकेदारा कडून साडेनऊ लाख रुपये घेऊन मजूर न देता त्याची फसवणूक केल्या प्रकरणी मोहोळ पोलिसात शुक्रवार ता 2 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. शंकर नवनाथ साळवे रा चकलांबा जिल्हा गेवराई असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, बिटले ता मोहोळ येथील जयवंत खंडू खताळ वय 42 यांनी अनगर ता मोहोळ येथील लोकनेते अग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याशी सन 2020/21 या गाळप हंगामात ऊस वाहतुकीसाठी करार केला होता. त्यांना ऊस तोडणी मजुरांची गरज होती.
खताळ यांनी त्यांचा ट्रॅक्टर ही कारखान्याला लावला होता. ऊस तोडणी मजुरांचा शोध घेत असताना ता 10 ऑक्टोबर 2020 रोजी खताळ यांचा ट्रॅक्टर चालक खेला मोरे याने त्याचे ओळखीचे मुकादम शंकर नवनाथ साळवे यांची खताळ बरोबर ओळख करून दिली. साळवे हे ऊस तोडणीची कामे घेण्यासाठी आल्याचे सांगितले.
चर्चा झाल्या नंतर 8 कोयते व 16 मजूर ऊस तोडणी साठी देतो अशी हमी साळवे यांनी दिली. हा संपूर्ण व्यवहार खताळ याचा भाचा भाऊसाहेब खरात याचे समक्ष साडेनऊ लाख रुपयाला ठरला. ठरलेले साडेनऊ लाख रुपये खताळ यांनी वकिला मार्फत नोटरी करून घेऊन तीन टप्प्यात दिले.
दरम्यान जयवंत खताळ यांनी मुकादम साळवे याला फोन करून तुम्ही माझ्या कडून पैसे घेऊन ऊस तोडणी मजूर दिलेले नाहीत, माझे घेतलेले पैसे परत द्या अशी मागणी केली. त्यावेळी साळवे याने तुम्ही दिलेल्या पैशाचा मी ट्रॅक्टर वगैरे घेतला आहे, त्यामुळे माझ्याकडे तुंम्हाला द्यायला पैसे नाहीत असे म्हणून साळवे हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. या प्रकरणी आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर जयवंत खंडू खताळ याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार आदलिंगे करीत आहेत.