वारंवार लागणाऱ्या आगीत जैविक संपत्ती होतेय नष्ट : जनजागृतीची गरज : नान्नज, सिद्धेश्‍वर विनविहार व शेटफळ रस्त्यावर ताज्या घटना 

Sidheshwar Vanvihar.jpeg
Sidheshwar Vanvihar.jpeg
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मुळातच अत्यल्प वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात दरवर्षी लागणाऱ्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविक संपत्ती नष्ट होत आहे. आग लागू नयेत यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य वनखात्याला आवश्‍यक असून नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनखाते जैविक संपत्तीचे संरक्षण होऊ शकत नाही. जनजागृती करून जैविक संपत्तीचे महत्त्व पटवून देणे आवश्‍यक आहे. यासाठी वन खात्याने योग्य त्या उपाययोजना करून आगी लागण्याचे प्रकार रोखावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. 

अत्यल्प वनक्षेत्र लाभलेल्या सोलापूर जिल्ह्यात नान्नज अभयारण्य, सिद्धेश्वर वनविहार व माढा-शेटफळ रस्त्यावरील सामाजिक वनीकरणाने केलेल्या वृक्षारोपण क्षेत्रात आग लागण्याच्या घटना नुकत्याच घडलेल्या आहेत. नान्नज अभयारण्यात लागलेल्या आगीत सुमारे आठ हेक्‍टर क्षेत्र जळून खाक झाले. नान्नज हे माळढोक अभयारण्य आहे. वन्यजीव संरक्षित सूची क्रमांक 1 मधील अतिदुर्मिळ माळढोक पक्ष्यांसाठी हे अभयारण्य राखीव आहे. या अभयारण्यात एकेकाळी 27 माळढोक पक्षी वास्तव्यास होते. आज येथे माळढोकचे दर्शन दुर्लभ झाले आहे. सध्या कधीतरी माळढोक दिसत असला तरी ससे, हरिण, मुंगूस, खोकड, कोल्हे, लांडगे अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य या अभयारण्यात आहे. 

जैविक साखळी टिकण्यासाठी पर्यावरणातील प्रत्येक जीवाचे महत्त्व आहे. नुकत्याच लागलेल्या आगीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक संपत्तीचे नुकसान झाले. मार्डी-अकोलेकाटी या गावाला जोडणारी विद्युतवाहिनी ही अभयारण्यातून जाते. या वीजवाहिनीच्या तारा अतिशय लूज आहेत. यामुळे वारंवार याठिकाणी स्पार्किंग होते. अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडतात. महावितरणने अभयारण्यातून गेलले विद्युतवाहिनी बाहेरून घ्याव्यात, अशी मागणी वन विभागाने अनेक दिवसापूर्वीच महावितरणकडे केलेली आहे. त्याची पूर्तता न झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

अनेकदा वैराग-सोलापूर रस्त्याने जाणारे दुचाकीस्वार, वाहनचालक पेटत्या सिगारेट बाहेर फेकतात, यामुळे रस्त्याच्या बाजूचे गवत पेट घेते, आणि आसपास कोणीच नसल्याने या आगीचे वणव्यात रूपांतर होते. याची झळ अभयारण्याला पोहोचते. यात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा व वन्यजीवांचे नुकसान होते. यासाठी वन विभागाने खास जनजागृती करणे आवश्‍यक आहे. नुकतीच अशी घटना माढा-शेटफळ रस्त्यावर घडलेली आहे. सार्वजनिक विभागाच्या जागेवर वनखात्याने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे, येथे वारंवार आगी लागतात. यामध्ये दरवर्षी केलेल्या वृक्षलागवडीचे नुकसान होते. पक्षांनी पेट घेतल्यामुळे पुन्हा ही झाडे वाढवण्यासाठी तितकेच दिवस लागतात. यासाठी लोकांमध्ये प्रबोधनाची आवश्‍यकता आहे. 

जाळ रेषा काढणे आवश्‍यक 
पेटत्या सिगरेट फेकण्याचे प्रकार, वाहनांच्या सायलेन्सरमधून येणाऱ्या टिनग्यामुळे लागणारे आगीचे प्रकार रोखणे कठीण आहे. यासाठी काही अंतरावर जाळ रेषा काढणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कमीत कमी क्षेत्र बाधित होते. समजा अशावेळी आगीने पेट घेतल्यास. सर्व झाडे नष्ट होण्याऐवजी थोडाच प्रदेश बाधित होतो. यासाठी वनखात्याकडून जाळ रेषा काढण्याचे आवश्‍यकता आहे. 


माढा-शेटफळ रस्त्यावर या घटना वारंवार घडत आहेत. याठिकाणी जाळरेषा काढण्याचा उपाय करण्यात येणार आहे. सध्या या बाधित वृक्षाला पाणी घालून जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वृक्षांची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्‍यक आहे. आग लागेल अशी कृती आपल्या हातून होऊ देऊ नये. 
- सुवर्णा माने, विभागीय वनधिकारी, सामाजिक वनीकरण, सोलापूर 

वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. अनेकदा काहीजण गैरसमजुतीमधून अशा आगी लावण्याचे प्रकार करतात. काही वेळा अनावधानाने आगी लागतात. लोकांनी सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याशिवाय वन्यजीव व जैविक संपत्तीचे संरक्षण शक्‍य नाही. 
- निनाद शहा, मानद वन्यजीव संरक्षक मित्र, सोलापूर 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com