बुधवारपासून सर्वांनाच मिळणार ‘कोर्बेवॅक्स’चा ‘बुस्टर’! जिल्ह्यात लसीकरणाची १३४ केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine Dose
बुधवारपासून सर्वांनाच मिळणार ‘कोर्बेवॅक्स’चा ‘बुस्टर’! जिल्ह्यात लसीकरणाची १३४ केंद्रे

बुधवारपासून सर्वांनाच मिळणार ‘कोर्बेवॅक्स’चा ‘बुस्टर’! जिल्ह्यात लसीकरणाची १३४ केंद्रे

सोलापूर : कोविशिल्ड लसीचा तुटवडा असून केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आता दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांना कोर्बेवॅक्स लसीचा बुस्टर (संरक्षित) डोस दिला जाणार आहे. बुधवारपासून (ता. १७) जिल्ह्यातील १३४ केंद्रांवर तो डोस दिला जाणार आहे. पण, तो निर्णय प्रत्येकांसाठी ऐच्छिक असणार आहे.

कोरोनाच्या भयावह दोन लाटानंतर कोविशिल्ड, कोवॅक्सिन व कोर्बेवॅक्स या तीन प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी झाला. प्रतिबंधित लसीमुळे मृत्यूचे ताडंव थांबले आणि कोरोना परतीच्या वाटेवर निघाला. लसीकरणामुळे हॉस्पिटलमधील खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडण्याची स्थिती पुन्हा उद्‌भवली नाही. दरम्यान, १८ वर्षांवरील जिल्ह्यातील ३४ लाख १४ हजार ४०० जणांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित होते. परंतु, लसीकरण सुरु होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीदेखील जिल्ह्यातील चार लाख व्यक्तींनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर अनेकांनी (११.१० लाख व्यक्ती) दुसरा डोस घेतलाच नाही. तरीपण, भविष्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो ही शक्यता गृहित धरून संरक्षित डोस मोफत दिला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १९ लाख व्यक्ती पात्र आहेत. त्यापैकी केवळ दीड लाख व्यक्तींनीच संरक्षित डोस घेतला आहे. अनेकांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले असून आता त्यांना ती लस मिळत नसल्याची स्थिती आहे. ज्यांना दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाली आहेत, त्यांच्या मोबाईलवर आता तिसरा डोस घेण्याचे मेसेज येत आहेत. त्या व्यक्ती कोर्बेवॅक्स लसीचा तिसरा डोस (संरक्षित बुस्टर डोस) घेऊ शकतात.

लसीकरणाची सद्यस्थिती

  • एकही डोस न घेतलेले

  • ४,१९,६७३

  • दुसरा डोस न घेतलेले

  • ११,१०,६९६

  • संरक्षित डोससाठी पात्र

  • १८,८७,३४०

  • संरक्षित डोस घेतलेले

  • १,४१,५३५

मोठ्या महाविद्यालयांमध्येही केंद्रे

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व तालुका ग्रामीण रुग्णालये, शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोर्बेवॅक्सचा संरक्षित डोस दिला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील मोठमोठ्या महाविद्यालयांमध्येही तशी सोय करून दिली जाणार आहे. कोरोनाची तीव्रता कमी करून मृत्यूदर रोखण्यात प्रतिबंधित लसीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सर्वांनी लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी केले आहे.

बुधवारपसून घ्या बुस्टर डोस

कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतलेले व्यक्ती कोर्बेवॅक्स लसीचा तिसरा संरक्षित डोस घेऊ शकतात. जिल्ह्यातील १३४ केंद्रांवर बुधवारपासून नागरिकांसाठी संरक्षित डोस घेण्याची सोय करून दिली जाईल.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर