Sugar Factory : एफआरपीचे अद्यापही १३८ कोटी रुपये थकीत; पाच कारखान्यांवर होणार आरआरसी अंतर्गत कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे २०२३-२४ च्या गाळप हंगामातील उसाच्या एफआरपीचे मेअखेर अजूनही १३८ कोटी रुपये थकले आहेत.
Sugar Factory
Sugar Factory sakal

माळीनगर : सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे २०२३-२४ च्या गाळप हंगामातील उसाच्या एफआरपीचे मेअखेर अजूनही १३८ कोटी रुपये थकले आहेत. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहेत.

त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना उर्वरित ऊसबिले तत्काळ मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने आरआरसी अंतर्गत कारवाई केली आहे.

जिल्ह्यात यावर्षी ३६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील कारखान्यांकडे एफआरपीचे ४१४ कोटी, मार्चअखेर ४५२ कोटी तर एप्रिलअखेर २५७ कोटी रुपये थकले होते. १५ मेअखेर १८ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे उसाचे १९५ कोटी अडकले होते. त्यानंतरच्या पंधरवड्यात म्हणजे मेअखेर कारखान्यांनी त्यापैकी ५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.

काही कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीनुसार निघणाऱ्या एफआरपीपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांना यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई, चाराटंचाईवर मोठा खर्च करावा लागला.

आता पावसाचे संकेत मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मशागत, बियाणे, खते याचा खर्च त्यांना खुणावत आहे. अशातच जून महिना सुरू झाल्याने मुलामुलींच्या शैक्षणिक प्रवेशासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

या कारखान्यांवर झाली आरआरसीची कारवाई

यंदाच्या ऊस गाळप हंगामात जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई झाली आहे. साखर कारखान्यांकडील साखर जप्त करण्याची तरतूद त्यामध्ये आहे.

म्हैसगावच्या विठ्ठल कार्पोरेशनवर २ फेब्रुवारीला ५६.७४ कोटी व २६ मार्चला २९.३८ कोटी रुपयांची, अशी दोनदा आरआरसी झाली. मातोश्री कारखान्यावर २२.५६ कोटी, विठ्ठल रिफाईंडवर १६.२१ कोटी तर आदिनाथ कारखान्यावर ०.६८ कोटी रुपयांची ३१ मे रोजी आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com