esakal | आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! त्यातील छदामही खर्चला नाही स्वत:साठी
sakal

बोलून बातमी शोधा

आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! त्यातील छदामही खर्चला नाही स्वत:साठी

सर्वाधिक पेन्शन घेणाऱ्यांच्या यादीत सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख हे अव्वलस्थानी होते.

आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! छदामही खर्चला नाही स्वत:साठी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यमान आमदारांना वेतन तर माजी आमदारांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील जवळपास 789 आमदारांना त्या पेन्शनचा लाभ मिळत आहे. सर्वाधिक पेन्शन घेणाऱ्यांच्या यादीत सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हे अव्वलस्थानी होते. त्यांचा मागील विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. त्यांना दरमहा पेन्शनपोटी मिळणाऱ्या रकमेतील एक रुपयाही त्यांनी स्वत:साठी खर्च केला नाही, हे विशेष. त्यांना दरमहा एक लाख 42 हजारांची पेन्शन मिळत होती. (Ganapatrao Deshmukh spent the pension amount for development works-ssd73)

हेही वाचा: आबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पाच वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदारांना दरमहा प्रत्येकी 50 हजारांची पेन्शन दिली जाते. तसेच दहा वर्षे आमदार राहिलेल्यांना 60 हजारांची आणि 15 वर्षे आमदार राहिलेल्यांना 70 हजारांची पेन्शन मिळते. आमदारकीच्या प्रत्येक वर्षांसाठी दोन हजारांप्रमाणे पेन्शनमध्ये वाढ होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातील माजी आमदार गणपराव देशमुख यांनी त्या मतदारसंघाचे तब्बल 55 वर्षे नेतृत्व केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माघार घेतली आणि नातवाला निवडणुकीत पुढे केले. परंतु, बदललेल्या राजकीय समीकरणात त्यांचा नातवाचा पराभव झाला. परंतु, जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या प्रश्‍नांसाठी सातत्याने आग्रही असलेल्या गणपतराव देशमुख यांनी त्यांना मिळणारी पेन्शन मतदारसंघातील विकासकामे व गरजूंना वैयक्‍तिक मदत करण्यासाठीच खर्च केली.

हेही वाचा: समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले

त्यासंदर्भात त्यांनी कोरोना काळात "सकाळ'कडे खंतही व्यक्‍त केली होती. कोरोना काळात जनता संकटात असल्याने आपण पेन्शनमधील सर्वच रक्‍कम त्यांच्या उपायांसाठी देत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. तसेच अशा अडचणीत सर्वच आमदारांनी (शक्‍य असलेल्यांनी) त्यांची पेन्शन आणि विद्यमान आमदारांनी त्यांचे वेतन जनतेसाठी द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली होती. त्यावेळी बहुतेक आमदार, माजी आमदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस, भाजपसह इतर पक्षातील काही आमदारांनी त्यांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. असा हा दूरगामी विचाराचा, नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणारा आमदार, जगावेगळाच होता, अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत.

सर्वाधिक पेन्शन घेणारा माजी आमदार

राज्याच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात 55 वर्षे आमदारकी कोणालाच मिळाली नाही. गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल 55 वर्षे आमदारकीची निवडणूक जिंकली. राज्यातील पेन्शन मिळणाऱ्या 789 माजी आमदारांमध्ये सर्वाधिक पेन्शन गणपतराव देशमुख यांना मिळत होती. तरीही, त्यांनी संपूर्ण रक्‍कम जनतेसाठीच खर्च केली.

loading image
go to top