समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले

समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले
समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले
समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपलेCanva
Summary

समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले, अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. आबांच्या जीवनातील आठवणी त्यांनी व्यक्त केल्या.

सोलापूर : राजकारणातील भीष्म पितामह व सर्वसामान्यांचे आबा माजी आमदार गणपतराव देशमुख (Former MLA Ganapatrao Deshmukh) यांचे वयाच्या 94 व्या वर्षी शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले, अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. आबांच्या जीवनातील आठवणी त्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या... (The people's representatives paid homage to former MLA Ganapatrao Deshmukh-ssd73)

समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले
"साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व हरपले'

गणपतराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातील एक संघर्षशील नेतृत्व आज आपण गमावून बसलो आहोत. मी आमदार होण्याच्या अगोदर 12 वर्षे पूर्वीपासून त्यांना असेंब्लीत पाहतो. असेंब्लीत दुष्काळी भागाच्या समस्या हिरिरीने मांडत असत. 1974 मध्ये मी आमदार झाल्यानंतर त्यांचे कार्य अधिक जवळून पाहता आले. जवळजवळ 11 वेळेस त्यांनी असेंब्लीत नेतृत्व केले. मी असेंब्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगोल्यात गेलो होतो. त्यावेळी भांबुरे माझा सहायक म्हणून निवडणुकीत उभा होता. तेव्हा ते म्हणाले की हा तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे. तुम्ही माझ्या विरोधात प्रचार करू शकता असे दिलदारपणे सांगणारा आमदार क्वचितच. गणपतराव देशमुखांनी गरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी जो झगडा उभा केला तो अतुलनीय मानला पाहिजे. सार्वजनिक जीवनात त्यांनी या संघर्षातून खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराचा आदर्श ठेवला. सांगोला या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी या तालुक्‍याला पाणी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न मोलाचे होते. आज जे सांगोल्यात पाणी उपलब्ध करून देण्याचे काम झाले आहे हे त्यांनी केलेले काम आहे. सांगोल्याचा पाण्याचा प्रश्‍न त्यांनी ज्या पध्दतीने सोडवला तो आम्हाला कधीही विसरता येणार नाही. समाजवादी विचाराचा एक खूप मोठा नेता अशी त्यांची ओळख होती. पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा ते सरकारमध्ये आमच्या सोबत होते. त्यावेळी ते शरद पवारांच्या मंत्रीमंडळात ते शेतकी मंत्री होते. मी देखील त्यांच्यासोबत होतोच. त्यांना शेतीच्या कामासाठी इस्त्रायलला पाठवले होते. इस्त्रायलवरून येताना त्यांनी त्यांच्या गाडी चालकासाठी घड्याळ घेतले व परत आल्यानंतर ते त्याला दिले. गरीब माणसाची आठवण ठेवून आपल्या कुटुंबातील एक समजून वागणारा हा आमदार विरळाच. मी सोलापुरात होतो तेव्हा त्यांना आठ दिवसापूर्वीच अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचे ऑपरेशन झाले होते. घरी सुखरुप परत या अशा शुभेच्छा देऊन आलो होतो. त्यांच्या कार्यपध्दतीने खऱ्या अर्थाने एक विचाराचा आदर्श स्थापन केला. समाजवादी विचाराचा हा मोठा नेता म्हणून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. गणपतरावजी म्हणजे संघर्ष. हा संघर्ष करणारा हा नेता आमच्यातून निघून गेला. ते आमच्यासाठी आदर्श होते. सत्वशील, चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख असणारा जनसमुदायाचा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. खरे म्हणजे सोलापूरमध्ये त्यांच्या निधनाने एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.

- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री

समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले
सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस

आबांची उणीव नेहमी भासत राहील

महाराष्ट्राला आणि विधानसभेला गणपतराव देशमुख यांची उणीव नेहमी भासत राहील. विधानसभेने देशमुख यांचा नेहमी सन्मान केला आहे. सभागृहात ते जेव्हा बोलायला उभे रहात, त्यावेळी सभागृहातील इतर सदस्य शांत बसायचे. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे कार्य, विचार व आदर्श कायमस्वरुपी महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील.

- प्रणिती शिंदे, आमदार

अभ्यासू नेतृत्व हरपले

स्व. ब्रह्मदेवदादा माने आणि गणपतराव देशमुख हे राजकारणातील जवळचे सहकारी होते. ब्रह्मदेवदादा यांच्यानंतर गणपतराव देशमुख यांच्यासोबत अनेक सहकारी संस्थांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून गणपतराव देशमुखांची महाराष्ट्रभर ओळख आहे.

- दिलीप माने, माजी आमदार

राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व

महाराष्ट्रात सर्वाधिकवेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम गणपतराव देशमुखांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे. "शेकाप'बद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. "शेकाप' सोडून अन्य पक्षात जाण्याचा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही. जनतेच्या प्रश्‍नांना त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. समाजकारणातील आणि राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते.

- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

समाजवादी विचाराचे संघर्षशील नेतृत्व हरपले
राजकारणातील भीष्मपितामह तथा भाईंचा जीवनप्रवास

राजकारणातील भीष्माचार्य

मार्क्‍सवादावर पकड असणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्यासोबत मला 1978 आणि 2004 अशा दोन टर्ममध्ये विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. तब्बल अकरावेळा आमदार म्हणून जनतेची सेवा बजावलेले देशमुख सांगोल्याच्या माळरानावर महिलांसाठी सूत गिरणी उभारून स्वावलंबी व समर्थ बनवणारे प्रजाहितदक्ष व निष्कलंक नेते होते. आपल्या प्रतिभाशक्ती व प्रगल्भतेने सत्ताधारी यांच्यावर अंकुश ठेवणे आणि विरोधकांना कोंडीत पकडणे याचे कौशल्य असणारे उत्कृष्ट विधानसभापटू गणपतराव देशमुख यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र पोरका झाला. राजकारणातील या भीष्माचार्यास अखेरचा लाल सलाम. भावपूर्ण श्रध्दांजली

- नरसय्या आडम, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com