भविष्यातही गांधींजीचे विचार जगाला तारक 

Gandhiji.jpg
Gandhiji.jpg

सोलापूर :महात्मा गांधीजींचे विचार आजच्या युगातही जगाला तारक आहेत. खेड्याकडे चला असा संदेश देत साध्या राहणीतून व निसर्गाचे संवर्धन करून निरोगी व निरामय आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली महात्मा गांधींजीनी आपल्या आचार विचारातून दिली. स्वातंत्र्य लढ्याचे कार्या संपल्यानंतर निसर्गोपचार पद्धतीसाठी आपले जीवन खर्च करणार, असे गांधींजीनी जाहीर केले होते. मात्र त्यांच्या हत्येमुळे गांधींजीचे स्वप्न अधुरे राहिले. त्यांनी दिलेला अहिंसा, स्वच्छता व स्वालंबनाच्या मार्गाने अनेक गांधीवादी आजही आपले जीवन व्यतित करत आहेत. गांधीवाद जगाला काल, आज आणि उद्याही तारक आहे, असा सूर गांधीवादी विचारांचे पाईक असलेल्या जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केला. 

गांधीवादाची भविष्यात देशासह जगाला गरज आहे. हिंसेऐवजी अहिंसा श्रेष्ठ आहे. भोगापेक्षा त्याग मोठा आहे, ही गांधीजींची शिकवण उराशी बाळगून त्यांच्या विचारवाटेने निघालेल्या काही गांधीवादी मान्यवरांच्या गांधी जयंतीनिमित्त या प्रतिक्रिया... 

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंदुभाई देढीया म्हणाले की, गांधीवाद रोगमुक्त सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी स्वत: गांधीवादाचा आंगिकार केल्यामुळे 2000 ते 2018 पर्यंत मला कसल्याही औषाध गोळ्यांची गरज भासली नाही. भोगवादापेक्षा त्याग महत्त्वाचा हे गांधीवाद सांगतो. प्रत्येकाने किमान एकादा तरी गांधीजींचे आत्मचरित्र वाचावे व गांधीवाद समजून घ्यावा. आपल्या देशातील सर्व सामन्यांना निसर्गोचार ही परवडणारी चिकित्सापद्धती असल्याने गांधीजींनी 1946 साली उरळी काचंन येथे निसर्गोपचार केंद्राची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर उर्वरीत आयुष्य आपण निसर्गोपचाराच्या प्रचार प्रसारासाठीच खर्च करण्याचा त्यांचा मानस होता. आता सर्व गांधीवादी लोकांना निसर्गापचार पद्धतीचा स्विकार करून गांधीजींना आदरांजली वाहावी. 

गांधीवादी विचाराचे अभ्यासक प्रा. नरेश बदनोरे यांनी सांगितले की, महात्मा गांधीजीं आजही जिवंत आहेत. 
महात्मा गांधीजींच्या विचाराची आज भारतासह जगाला गरज आहे. हिंसेने वैरभावनेने कोणतेही प्रश्‍न सुटत नाहीत तर प्रेमभावनानेच सुटू शकतात. निसर्गासोबत राहा, निसर्गावर प्रेम करा. ही भूमी सर्वांची गरज भागवू शकते, मात्र एकाची हाव भागवू शकत नाही, ही महात्मा गांधीजींची भूमिका होती. आजच्या जगात विकासाच्या नावाखाली संवेदनाहिन माणसाची फौज तयार होत आहे. मानसाची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे. 1929 मध्ये गांधींजी म्हणाले होते. जगाची वाटचाल विनाशाकडे सुरू असताना भारतच जगला दिपस्तंभासारखा मार्गदर्शन करेल. गांधींजी हे त्यांच्या विचाराच्या रुपाने आजही जिवंत आहेत. 

नई तालिमचे उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, वर्धा येथे झालेल्या वर्धा येथील शिक्षण परिषदेमध्ये गांधीजींनी नई तालिम (बुनियादी शिक्षण) ही संकल्पना मांडली. कर्मातून ज्ञान, ज्ञानातून व्यवहार व व्यवहारातून जीवन शिक्षण नई तालिमची शिक्षण मुल्ये आहेत. शिक्षण हे माहितीजन्य नको तर ते प्रत्यक्ष कौशल्यातून आलेले असावे. चारित्र्य संवर्धनासाठी गांधीजींनी एकादश व्रते त्यांनी सांगितली. मन, मनगट व मस्तिष्क शिक्षणासाठी एकत्रित असावीत. ऍक्‍टिव्हीटी बेस्ड शिक्षण ही त्यांची भूमिका होती. आता नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य शिक्षण समाविष्ट झाले. त्याची पायाभरणी गांधीजींनी केलेली आहे. उत्तम कौशल्याद्वारे कृतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पैलू आत्मसात करता आली पाहिजेत हा त्यांचा दृष्टीकोन होता. माहिती कोंबणे म्हणजे शिक्षण नव्हे. स्थानिक गरजा व संसाधनाचा वापर करून स्वतःमधील कौशल्ये विकसित करणे, ही अपेक्षा नई तालिम शिक्षण पध्दतीमध्ये समाविष्ट केली आहेत. 

मोहोळ येथील गांधीवादी विचाराचे पाईक अनिल कोरे यांनी सांगितले की, या पृथ्वीतलावर असलेले कोणतेही जिवजंतू विनाकारण कुणावरही आक्रमण करत नाही. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी, बचाव करण्यासाठी ते आक्रमण करतात. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला आहे. हिंसेने कोणतेही प्रश्‍न सुटत नाहीत. ते वाढतच जातात. त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने जगण्याचा, प्रश्‍न सोडविण्याचा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला. त्याला संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे. कधीही अहिंसेच्या माध्यमातून समोरच्याचे मन जिंकून राज्य करावे. गांधी अभ्यासने सोपे आहे. पण, गांधीजींसारखे जीवन जगणे फार कठीण आहे. त्यांनी सांगितलेला अहिंसेचे मार्ग सगळ्यांना तारणारा आहे. 

शिक्षिका स्वाती शहा यांनी सांगितले की, गांधीजी हे अहिंसेचे पुजारी आहेत. त्यांच्या तत्वाचे आचरण प्रत्येकांनी आपल्या जीवनात करायला हवे. माझ्या विद्यार्थ्यांना अहिंसेच्या मार्गाने चालण्याबाबत नेहमीच मार्गदर्शन करते. देशाला स्वातंत्र्य दोन मार्गांनी मिळाले. त्यामध्ये अहिंसा हा एक मार्ग होता. गांधीजींनी त्या मार्गाचा अवलंब स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केला. अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी समोरच्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. हिंसेचा त्याग करुन अहिंसा प्राप्त करण्याचा मार्गही गांधीजींनी समाजाला दिला. त्यांच्या या मार्गाचा भविष्यातही निश्‍चितच फायदा होत राहिल. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, मानवी आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छताही खूप महत्वाची आहे. अस्वच्छता हा एक मानसिक आजार आहे. या आजारातून वैयक्कि पातळीवर मुक्त होण्याची आवश्‍यकता आहे. घरातच कचरा विलगीकरणाची सवय लागल्यास या आजारातून मुक्त होण्यास मदत होईल. स्वच्छतेसाठी शासनासोबत समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा आहे. 
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य ऍड. उमेश भोजने म्हणाले की, 
अस्वच्छतेमुळे मानवी आरोग्य धोक्‍यात येत असल्याने महात्मा गांधी यांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. या मंत्रानूसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने आजपर्यंत वाटचाल केली आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता ग्रामीण भागातही स्वच्छता गृह झाली आहेत. नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्व पटू लागले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत समाजात सकारात्मक बदल झालेले दिसत आहेत. 

गांधीजींनी सोलापूरला भेट दिल्याच्या आठवणी बद्दल प्रा. लक्ष्मी रेड्डी लिहितात की, महात्मा गांधीजी यांनी सोलापूरला दोन वेळा भेट दिली. असहकार चळवळीच्या आंदोलनासाठी ते 26 मे 1921 मध्ये ते आले. शेठ हिराचंद नेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची सभा झाली. यावेळी गांधीजींनी लोकमान्य टिळक स्मारकासाठी निधी देण्याचे आवाहन केले. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1927 रोजी गांधीजी हे कस्तुरबा यांच्यासह सोलापूर शहरात आले. ते तीन दिवस छत्रपती संभाजी तलावाजवळील मोतीबाग विश्रामगृहात थांबले. जुनी मिलला त्यांनी भेट दिली. नंतर पंढरपूरला त्यांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास भेट दिली. वळसंग येथे सभाबंदीचा आदेश मोडून शंकरलिंग मैदानावर जाहीर सभा घेतली. नंतर राचप्पा मेटकरी यांच्या वाड्यात अनुयायांची बैठक घेतली. सोलापूर नगरपालिकेने त्यांना या भेटीत मानपत्र देऊन त्यांची देशसेवा, त्याग, गरिबाबद्दलची कळकळ, अस्पृश्‍यता निवारणाच्या प्रयत्नाबद्दल गौरव केला. गांधीजींच्या करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी येथेही सभा झाल्या होत्या. 

सोलापूरच्या सुपुत्राने केला स्वच्छतेचा पॅटर्न 
सोलापूरचे सुपुत्र रामदास कोकरे यांनी स्वच्छतेच्या बाबतीत पॅटर्न निर्माण केला आहे. कोकणातील वेंगुर्ला, कर्जत आणि माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम करताना त्यांनी या नगरपरिषदा कचरामुक्त केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी दापोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम करताना दापोली गाव कचरामुक्त आणि प्लॅस्टिक मुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याने त्यांची ओळख देशभर झाली आहे. औरंगाबाद शहर स्वच्छ करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेत स्वच्छतेच्या कामासाठी त्यांची मार्गदर्शक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. कोकरे सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत असून त्या ठिकाणीही त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com