Ganpati Festival: गणपती बाप्पाचे घर सजवा पानाफुलांच्या माटीने, कसे ते घ्या जाणून...

Ganpati festival
Ganpati festival

सोलापूरः गणेश स्थापनेसाठी प्लास्टिक फुलांच्या निर्जिव सजावटी ऐवजी कोकणातील पानाफुलाची सजावटीची माटी नावाची परंपरा घरातील गणेश मूर्तीला निसर्गाचा हिरवागार स्पर्श करणारी आहे. तसेच गणेशोत्सवात निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी आहे. नैसर्गिक सजावटीची माटी गणेशाच्या आसनाला वेगळी शोभा देणारी आहे. बच्चे कंपनींनी परिसरातील फुले, पाने व फळे शोधून एकदा माटी बनवून पाहावीच.

कोकणचे संस्कृती अभ्यासक नितिन कवठनकर (मो. ८७६६४४७५२३) यांनी गणेश स्थापनेच्या वेळी नैसर्गिक पानाफुलांनी सजावट करण्याच्या माटी परंपरेची माहिती दिली. माटी परंपरा प्रत्येक घरातील गणेश स्थापनेत मुलांना निसर्ग संस्काराचा वारसा देणारी आहे.

Ganpati festival
गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी फुलांपासून करा ही अनोखी सजावट

कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे ते प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.

पावसामुळे श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहाराने परिसर हिरवागार झालेला असतो. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो.

माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा या आहेत.

- आंब्याचे टाळे :- आंबा

Mangifera indica (Anacardiaceae)

माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

- केवणीचे दोर (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग

Helicteris isora (Malvaceae)

आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधीसाठी वापरतात.

Ganpati festival
Ganesh Festival: देशोदेशीचे गणपती : गणेशोत्सव इंग्लंडचा!

- उतरलेला नारळ :- नारळ / माड

Cocos nucifera (Arecaceae)

माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

- शिप्टा (कातरो) :- सुपारी / फोफळ

Areca catechu (Arecaceae)

शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

-तवसा (काकडी) :- काकडी

Cucumis sativus (Cucurbitaceae)

काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

याशिवाय माटी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून पुढील वनस्पती देखील वापरतात.

- हरण (हराण) :- सोनकी

Senecio bombayensis (Asteraceae)

सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

Ganpati festival
Dhule: रिजवान पिंजारीने दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश! कासारेत बहुउद्देशीय विद्यालयात इकोफ्रेंडली गणपती स्पर्धा

- कवंडळ (कौंडाळ) :- कवंडळ

Trichosanthes tricuspidata (Cucurbitaceae)

कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले व लाल गोलाकार फळे येतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते.

-कांगणे (कांगले) :- कांगुणी

Celastrus paniculatus (Celastraceae)

कांगुणी ही एक वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात.

- सरवड (शेरवाड) :- सरवड

Mussaenda glabrata (Rubiaceae)

सरवड ही एक आधाराने वाढणारे झुडूप आहे. याला भगवी फुले येतात तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात.

- आयना :- ऐन / असन

Terminalia elliptica (Combretaceae)

ऐन हे इमारती लाकडाचे झाड. ऐनाची फळे (आयना) पाच पदराची जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात.

- तेरडा (तिरडा) :- तेरडा

Impatiens balsamina (Balsaminaceae)

पावसाळ्यात बहरणाऱ्या फुलांपैकी एक लहान झाड तेरडा. याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात.

- वाघनखी :- कळलावी / वाघनखी

Gloriosa superba (Colchicaceae)

वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजून रंग भरतात.

Ganpati festival
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाला तुळस वाहू नये, पण का?

- नरमाची फळे :- नरम / बोंडारा

Lagerstroemia parviflora (Lythraceae)

नरम हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात.

- नागकुड्याची फळे :- नागकुडा

Tabernaemontana alternifolia (Apocynaceae)

नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनख असे म्हटले जाते. माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती वापरून माटी सुंदर सजवली जाते. यासंबंधात आळस न करता आपणही पाने, फुले व फळांनी माटीची सजावट घरच्या गणपती बाप्पाला करू या. या वनस्पती गणेश स्थापनेच्या दिवशी बाजारात विक्रीसाठी आलेल्या असतात. त्या खरेदी करुन विक्रेत्याला चार पैसे देऊन त्याचे हित जपायला हवे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com