
सोलापूर - शॉक लागून पाच वर्षाच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. २९ जुलै २०२१ रोजी घडली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील, तत्कालीन मुख्य तांत्रिक अधिकारी सी.टी.ओ, एस.सी.डी.सी.एल, मॅनेजर सनर्वमल खटुवाला, प्रोजेक्ट मॅनेजर मिलिंद पेठे, इलेक्ट्रिक इंजिनिअर नरेश शर्मा, रोहित रसेराव, चंद्रकांत जनार्दन दिघे, गणपत विष्णू कांबळे, राजू नागनाथ बागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची हकीकत अशी, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.यांनी विजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीस महाराष्ट्र राज्याचे विद्युत ठेकेदाराला अनुज्ञाप्ती नसतानाही त्यांना विद्युत कामाचा बेकायदेशीरपणे ठेका देण्यात आला. मात्र, विजय इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे व्यवस्थापक खटुवाला, पेठे, शर्मा, रसेराव यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची विद्युत ठेकेदाराची मान्यता नसतानाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस या मार्गावर विद्युत एल.टी फिडर पिल्स बसवली. त्यावेळी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे व बाळीवेस विभागाचे शाखाधिकारी गणपत विष्णु कांबळे, वायरमन राजू बागडे यांनी वेळोवेळी त्या भागात पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी असताना त्यांनी निष्काळजीपणा व हयगय केली. सर्वांनी कामात निष्काळजीपणा करून एल.टी फिडर पिल्स बसवून त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केला. सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न केल्याने पूर्वा अलकुंटे या चिमुकलीचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यासाठी वरील सर्वजण कारणीभूत आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दांडगे हे तपास करीत आहेत.