
"ट्रॉफीने मोठी प्रेरणा दिली ! गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यापुढेही राहणार प्रयत्नशील'
बार्शी (सोलापूर) : देशाच्या शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या रणजितसिंह डिसले गुरुजी (Global teacher Ranjit Singh Disley) यांना काही महिन्यांपूर्वी लंडन येथील वार्की फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल टीचर ऍवॉर्डने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पार पडला होता. सोमवारी सायंकाळी या पुरस्काराची मानाची ट्रॉफी त्यांना प्राप्त झाली अन् त्यांचा आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ट्रॉफीने मोठी प्रेरणा दिली असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. डिसले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. (Global teacher Ranjit Singh Disley said that getting the trophy has given him more inspiration)
हेही वाचा: राज्यातील धरणांत केवळ 10 टक्के पाणीसाठा ! पुणे विभागात गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के पाणी कमी
देशाप्रमाणेच महाराष्ट्राची अभिमानाची घटना असलेल्या ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची निवड 140 देश व 12 हजार शिक्षकांच्या नामांकनातून घोषित झाली होती. क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती केलेल्या कामाची दखल घेत वार्की फाउंडेशन युनेस्को, लंडन यांनी पुरस्कार जाहीर केला होता. मिळालेल्या पुरस्कारातील 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर करून नऊ देशातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल असा मनोदय व्यक्त केला होता.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली असून, डिसले गुरुजी यांना मिळालेल्या बक्षिसातून दहा वर्षात 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 36 हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.
प्रतीक्षा संपली, मानाची ट्रॉफी हातात मिळाली, अजून प्रेरणा जास्तच मिळाली आहे. खूप आनंद झाला आहे, असे सांगून डिसले गुरुजी म्हणाले, लॉकडाउन काळामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. अडचण येत असेल तर सदैव मदत करण्यास मी अहोरात्र तयार आहे.
Web Title: Global Teacher Ranjit Singh Disley Said That Getting The Trophy Has Given Him More
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..