
नवनिर्माण राष्ट्रवादासाठी माजी आमदार पाटील यांनी भाजप मध्ये यावे; मुख्यमंत्री सावंत
मोहोळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नवनिर्माण राष्ट्रवादाचे मोठे काम करीत आहेत, माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे काम करण्या ऐवजी नव निर्माण राष्ट्रवादाचे काम करावे, माजी आमदार पाटील यांच्या सारख्या अभ्यासून नेत्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येण्याचे माझे आवतन स्विकारावे असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री सावंत हे बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते माढ्याला जाताना माजी आमदार पाटील यांच्या निमंत्रणामुळे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी थांबले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, सामाजिक कार्यकर्ते रवी पाचपुंड, लोकनेते कारखान्याचे सीईओ ओमप्रकाश जोगदे,यांच्यासह माजी आमदार पाटील कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ सावंत पुढे म्हणाले, डबल इंजिनच्या सरकारमुळे मोठा विकास झाला आहे, त्यात गोव्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. भाजपात येणाऱ्यांचे स्वागतच आहे ,मात्र हे सर्व काम भाजपा प्रदेश यंत्रणा पाहते.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात विचारले असता, मुख्यमंत्री शिदें व त्यांच्या सर्व सहकार्याचे मी अभिनंदन करतो. लोकांना जे पाहिजे होते ते सरकार आले आहे, त्यामुळे विकास आता फार दूर नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यावर सतत टीका करतात त्या बाबत त्यांना विचारले असता, ज्यांच्याकडे आता काहीच राहिले नाही त्यांना केवळ टीका करणे हे एवढे एकच काम असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रवेश करताच स्वच्छता अभियानाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाल्याचे ही मूख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ सावंत हे माजी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर पाटील यांना भाजपा प्रवेशा बाबत विचारले असता, भाजपा प्रवेशाचा निर्णय घेणारा मी कोण? माझ्या वडिलांपासून ते माझ्यासह माझ्या आताच्या पिढी बरोबर माझ्या मोहोळ मतदार संघातील मतदार आमच्या पाठीशी आहेत. 144 गावांचा मतदार संघ आहे.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी दिलेले आवतन व निरोप मी त्यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे, मतदारांचा जो निर्णय होईल तो मला मान्य असेल, मात्र विचार विनिमय करण्यासाठी थोडा वेळ लागेल. "योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ" असे सूचक विधान माजी आमदार पाटील यांनी यावेळी केले.यावेळी मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर डॉक्टरांनी मुख्यमंत्री डॉ सावंत यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.
नक्षत्र प्रकरणा बाबत माजी आमदार पाटील यांना विचारले असता, माझे विरोधक नक्षत्र चे प्रकरण मिटविण्यासाठी भाजपमध्ये चालले असल्याची अफवा पसरवत आहेत. परंतु नक्षत्रचा विषय हा गेल्या दोन वर्षांपूर्वीच संपला आहे.
त्याचा आम्ही आमच्या मेरिट वर निकाल घेतला आहे. त्यामुळे नक्षत्रचा विषयच नाही. माझ्या आई वडिलावर ही अनेक गुन्हे दाखल होते, अशी अनेक संकटे आमच्या कुटुंबावर आली मात्र आम्ही त्याला घाबरणारे नसल्याचेही माजी आमदार पाटील त्यांनी सांगितले.
कोण काय म्हणाले
माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी ऐवजी राष्ट्रवाद नवनिर्माणाचे काम करावे
मी माझे मित्र डॉ अभय लुनावत यांच्या निमंत्रणावरून आलो आहे
माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी मुद्दाम स्वागत समारंभ आयोजित केला आहे-
मुख्यमंत्री डॉ सावंत
आम्ही संकटाला न घाबरणारे आहोत मुख्यमंत्री सावंत यांचा निरोप मी मतदारा पर्यंत पोहोचविणार आहे त्यांचा निर्णय जो होईल तो मला मान्य असेल.
माजी आमदार राजन पाटील