esakal | रुग्णांसाठी खुषखबर ! शहरात 'या' दोन ठिकाणी होणार प्रत्येक आजारांवरील सल्ला व उपचार केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

3pill1.jpg

सल्ला व उपचार केंद्राची वैशिष्ट्ये.. 

  • उच्च रक्‍तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, दमा, फुफ्फुसाच्या आजारासह 20 प्रकारच्या गंभीर आजारांवर मिळणार मार्गदर्शन व उपचार 
  • प्रत्येक आजारांवरील तज्ज्ञांची त्याठिकाणी असणार उपलब्धता; 24 तास सुरु राहणार हे केंद्र 
  • ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मिळेल त्याठिकाणी सेवा; सल्ला व उपचार असणार मोफत 
  • गंभीर आजाराच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ; योजनेंतर्गत खासगी दवाखान्यातूनही मिळतील मोफत उपचार 

रुग्णांसाठी खुषखबर ! शहरात 'या' दोन ठिकाणी होणार प्रत्येक आजारांवरील सल्ला व उपचार केंद्र

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची मनातील भीती, या आजाराचा धोका आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. यानिमित्ताने कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये समुपदेशन केंद्रे सुरु आहेत. मात्र, कोरोनानंतरच्या काळातही रुग्णांना विविध आजारांसंबंधी मार्गदर्शन मिळावे, आजारावर मात करण्यासाठी त्यांनी काय खबरदारी घ्यावी, या हेतूने सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि बाईज नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला (समुपदेशन) केंद्रे सुरु केली जाणार आहेत.

जिल्ह्यात उच्च रक्‍तदाबाचे 76 हजार रुग्ण 
सोलापूर शहर-जिल्ह्यात मधुमेहाचे 55 हजार 894 रुग्ण आहेत. तर हृदयरोगाचे दोन हजार 829, कर्करोगाचे एक हजार 606 आणि उच्च रक्‍तदाबाचे सर्वाधिक 75 हजार 594 रुग्ण आहेत. त्यामध्ये माळशिरस, बार्शी हे दोन तालुके अव्वल असून शहरातही उच्च रक्‍तदाब असलेले 28 हजार रुग्ण आहेत. दमा, फुफ्फुसाचे आजार असलेले साडेपाच हजार तर मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत आहे. डायबेटिस व उच्च रक्‍तदाबाच्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या वेगळीच आहे. अशा विविध 20 प्रकारच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांना नव्याने उभारण्यात येणाऱ्या सल्ला व उपचार केंद्राचा लाभ होणार आहे. 

सोलापूर शहर-जिल्ह्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह (डायबेटिस), हृदयरोग, कर्करोग, उच्च रक्‍तदाब, दमा, फुफ्फुसाचे आजार आणि दुर्धर मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांची संख्या एकूण पाच लाख 18 हजार 753 आहे. दुसरीकडे तरुण, तरूणी, महिला, नोकरदार, कामगार वर्गातील काहीजणांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविणे, त्यांना मानसिक आधार देऊन त्यांच्या आजारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी या सल्ला केंद्रांचा उपयोग केला जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पानुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनापाश्‍चात सल्ला व उपचार केंद्र उभारले जाणार आहेत. त्यात सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटलचा समावेश आहे. त्याठिकाणी रुग्णांना त्यांच्या आजारांसंबंधी मोफत सल्ला दिला जाणार असून तिथेच उपचारही केले जाणार आहेत.

बॉईज हॉस्पिटलमध्ये समुपदेशन केंद्र 
कोरोनापाश्‍चात शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना त्याच्या आजारावर सल्ला मिळावा, त्याच्या आजारावर वेळेत निदान व्हावे, या हेतूने बॉईज हॉस्पिटलमध्ये तसे केंद्र उभारले जाणार आहे. त्याठिकाणी प्रत्येक आजारांवरील तज्ज्ञांची नियुक्‍त आगामी काळात शासनाच्या मान्यतेनुसार केली जाईल. 
- डॉ. बिरुदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

सल्ला व उपचार केंद्राची वैशिष्ट्ये.. 

  • उच्च रक्‍तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, दमा, फुफ्फुसाच्या आजारासह 20 प्रकारच्या गंभीर आजारांवर मिळणार मार्गदर्शन व उपचार 
  • प्रत्येक आजारांवरील तज्ज्ञांची त्याठिकाणी असणार उपलब्धता; 24 तास सुरु राहणार हे केंद्र 
  • ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मिळेल त्याठिकाणी सेवा; सल्ला व उपचार असणार मोफत 
  • गंभीर आजाराच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ; योजनेंतर्गत खासगी दवाखान्यातूनही मिळतील मोफत उपचार 
loading image