esakal | सोलापूरसाठी गुड न्यूज : 47 जणांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

collector solapur
  • जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले... 
  • लॉकडाउनसाठी पोलिसांना दिल्या 25 गाड्या 
  • पोलिस आयुक्तांना पाच तर पोलिस अधीक्षकांना दोन ड्रोन 
  • विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे ठेवणार लक्ष 
  • आदेश उल्लंघनप्रकरणी आजपर्यंत जिल्ह्यात दाखल झाले 2240 गुन्हे 
  • आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी आजपर्यंत 2011 जणांना अटक 
  • आजपर्यंत जप्त केली 4914 वाहने 

सोलापूरसाठी गुड न्यूज : 47 जणांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : वांगी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार ग्वाल्हेर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या कामगाराच्या संपर्कात एकूण 56 व्यक्ती आल्या होत्या. त्यापैकी 47 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामध्ये वांगी परिसरातील व 37, कामती (ता. मोहोळ) येथील सहा जणांचा व बोराळे (ता. मंगळवेढा) येथील चार अशा एकूण 47 जणांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आयसोलेशन वॉर्डात दाखल केलेल्या वांगी परिसरातील 9 जणांचा अहवाल अद्याप प्रलंबित असून हा अहवाल उद्या (शनिवार) मिळेल माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

हेही वाचा - कारवरचा ताबा सुटून झाडावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू 

वांगी परिसरातील 611 घरांमधील तीन हजार 60 जणांची तपासणी झाली असून त्यामध्ये सर्वजण व्यवस्थित असल्याचे आढळले आहे. कोरोनाची चाचणी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत केली जात आहे. या प्रयोगशाळेत सोलापूरसह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी येऊ लागल्याने वांगी परिसरातील नमुन्यांच्या तपासणीला विलंब लागण्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. शुक्रवारी रात्री दहापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 371 जण होम क्वारंटाइनमध्ये, 200 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये तर 51 जण आयसोलेशन वॉर्डात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या मरकजमध्ये (केंद्रात) झालेल्या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील 53 जण सहभागी झाले होते. या 53 जणांची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पहिली टेस्ट झाल्यानंतर आठ दिवसांनी दुसरी टेस्ट घेतली जात आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये 53 पैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित व्यक्तींचीही तपासणी केली जाणार असून निगेटिव्ह टेस्ट आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे. 

हेही वाचा - कोरोनासाठी मदत करा, अभिषेक करून प्रसाद घरी पाठवू; श्री स्वामी समर्थ समाधी मठाचा उपक्रम 

"सारी' टेस्टमध्ये 25 निगेटिव्ह, दोघांचे अहवाल प्रलंबित 
औरंगाबादमध्ये सारी (सिव्हीयरली अक्‍यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराने थैमान घातले आहे. कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या सारी आजारामुळे औरंगाबादमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सारीसदृश आजाराचे 27 जण आढळले होते. त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

loading image