
पंढरपूर (सोलापूर) : नाशिकनंतर सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे पीक घेतले जाते. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात केली जाते. यावर्षी केंद्र सरकारने सुरवातीलाच द्राक्षाचे निर्यात अनुदान बंद करून शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्यात धोरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार टन द्राक्षाची निर्यात ठप्प झाली आहे. केंद्र शासनाने निर्यात अनुदान तातडीने सुरू करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
मागील वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा सोलापूरसह राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. या नैसर्गिक संकटातून शेतकरी कसा तरी सावरत असतानाच, केंद्र सरकारच्या या नव्या निर्यात धोरणामुळे द्राक्ष शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून द्राक्षाची विविध देशांत मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. राज्याच्या द्राक्ष निर्यातीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा सुमारे 40 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. सोलापूर जिल्ह्यातील रसाळ आणि गोड द्राक्षांना युरोपसह आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. निर्यातीमुळे स्थानिक बाजारातही द्राक्षाला चांगले दर मिळतात. यावर्षी द्राक्षाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असतानाच, निर्यात अनुदान बंद झाल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे भाव प्रतिकिलो 30 रुपयांनी गडगडले आहेत. तर स्थानिक बाजारातही 50 रुपयांचा दर 30 रुपयांवर आला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात 35 हजार हेक्टरवर द्राक्षाचे पीक घेतले जाते. यामध्ये 40 ते 50 टक्के शेतकरी युरोपीय देशात द्राक्षाची निर्यात करतात. निर्यातीमुळे द्राक्षाना चांगला दर मिळतो. गतवर्षी कोविड - 19 चा संसर्ग झाल्याने द्राक्षाची निर्यात फार कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख मोलाची द्राक्षे कवडीमोल दराने स्थानिक बाजारात विकावी लागली होती. या संकटानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम नुकताच सुरू झाला आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारीच फिरकत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, टाकळी येथे पिवळ्या द्राक्षांचे मोठे उत्पादन घेतले जाते. येथील या द्राक्षांना युरोपीय देशांत मोठी मागणी आहे. दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातून किमान दहा हजार टन द्राक्षे निर्यात होतात. पण यंदा केंद्र सरकारने अनुदान धोरणात बदल केला. त्याचा फटका सोलापूरसह राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारने निर्यात अनुदान पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
राज्यात सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 40 टक्क्यांहून अधिक द्राक्षे निर्यात केली जाते. दरवर्षी केंद्राकडून निर्यात अनुदान दिले जाते. यावर्षी मात्र केंद्र सरकारने द्राक्षाचे निर्यात अनुदान बंद केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार टन द्राक्षाची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात भाव कमी झाले आहेत. अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात अनुदान सुरू करावे.
- सुरेश टिकोरे
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.