हिरवाईच्या चळवळीला विदेशातूनही मिळतोय प्रतिसाद

nisarg2.jpg
nisarg2.jpg

सोलापूरः निसर्गप्रेमी व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत वृक्षारोपण, झाडाची जोपासना व घरगुती बाग उभारणीच्या माध्यमातून सोलापुरातील नागरिकांत वृक्ष जागरूकतेची चळवळ उपक्रमातून रुजली आहे. 

येथील सामाजिक कार्यकर्त्या  अॅड.  सरोज बच्चुवार यांना सुरवातीपासून घरात अनेक झाडे लावण्याची आवड होती. ग्लोबल इफेक्‍टचे दुष्परिणामावर केवळ झाडांची जोपासना हा एकमेव उपाय असल्याचे म्हंटले होते याचा विचार करून त्यांनी हा संदेश इतरामध्ये रुजवावा म्हणून प्रयत्न सुरू केले. वर्ष 2018 मध्ये त्यांनी निसर्गप्रेमीचा व्हॉटसऍप ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये केवळ झाडांची लागवड, देखभालीच्या उपक्रमाचे संदेशाची देवाणघेवाण केली जाते. 

हळूहळू शहरातील निसर्गप्रेमी मंडळी या ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली. झाडे कशी लावायची, घरच्या घरी खत कसे तयार करायचे, झाडांच्या आजारावर उपचार यासह बाल्कनी बाग, टेरेस गार्डन, परसबाग, किचन गार्डन या संकल्पनावर विचाराची देवाण घेवाण सुरू झाली. झाडांना आलेली फुले, फळे, झाडांच्या मदतीने केलेल्या सजावटी, सणाच्या दिवशी झाडांची सजावट आदी अनेक प्रकारचे उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून वाढू लागले. झाडांसंदर्भात प्रत्यक्ष केलेल्या कृतीचे व्हिडीओ व फोटोचा वापर करता येऊ लागला. आता सहाच्या वर ग्रुप कार्यरत आहेत. 
अनेक घरांत एक तुळशीचे रोप नव्हते. त्यांच्या घरात बाल्कनी व टेरेसवर झाडांच्या कुंड्या लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. झाडांचे औषधी महत्त्व, भाज्यांची लागवड, ऑक्‍सिजन देणारी झाडे, दुर्मिळ झाडे भाज्यांचे आहारातील महत्त्व अशा अनेक माहितीची देवाण- घेवाण करत हे वृक्षप्रेमी सजग झाले. झाडांना लागणारी खते घरीच तयार होऊ लागली. कलम तयार करणे, बियापासून झाडांची निर्मिती, वृक्षसजावट, इकोफ्रेंडली गणपती, बोन्साय मेकिंग, ऑक्‍सिजन कॉर्नर आदी उपक्रमांची देवाण-घेवाण होते. 

लहान मुले, महिला, पुरुष व अगदी वृद्ध मंडळी सहभागी होतात. त्यासोबत माझी बाग, बेस्ट फ्रॉम वेस्ट, मीयाबाकी जंगल आदी अनेक प्रयोगांची ग्रुप सदस्यांनी मांडणी करून ती यशस्वी केली. स्वयंप्रेरणेने नागरिक या उपक्रमात सहभागी होतात. सदस्य फुललेली झाडे, झाडांचे व्हिडीओच्या माध्यमातून परस्परांना संदेश देतात. झाडाच्या बाबतीत अनेक समस्या देखील सहज सोडवल्या जातात. या ग्रुपमध्ये झाडा शिवाय इतर कोणतेही संदेश स्विकारले जात नसल्याने कामाची शिस्त टिकली आहे. 
टेरेस गार्डनमुळे घर थंड राहण्यास मदत होते. झाडे अगदी लहान असल्याने त्यांना पाणी देखील जास्त लागत नाही. मात्र घराला शोभा येते. अनेकांनी घरातचे ऑक्‍सीजन कॉर्नर करून अधिक ऑक्‍सीजन देणारी झाडे लावून घर सजवले आहे. लहान मुलांना रोपे वाढवायची, पाणी द्यायचे अशा कामात गुंतवल्याने टीव्ही मोबाईल पासून दुर राहतात. शाळेतून आले की ते आधी झाडाकडे लक्ष देतात. अनेक कुटुंबातील सर्वांना झाडांची देखभाल करण्याची सवय झाल्याने घरातील अनावश्‍यक चिडचिड, अती टिव्ही पाहणे या गोष्टी कमी झाल्याचा अनुभव देखील येतो आहे. हिरव्या झाडामुळे घराचे सौंदर्य देखील वाढले आहे. रोपांची देवाणघेवाण, लग्नात रोपांची भेट, लग्नपत्रिका पाकिटात झाडांच्या बिया देणे अशा कितीतरी गोष्टी हे सदस्य स्वयंप्रेरणेने करत असतात. अनेकांनी स्वतः वेगळ्या पध्दतीने दुर्मिळ वनस्पतीच्या बागा विकसीत केल्या आहेत. 
या शिवाय शहरातील अनेक भागात रिकाम्या जागांचा शोध घेऊन तेथे झाडे लावण्याचे काम देखील सदस्य करत असतात. रस्त्याच्या दुतर्फा देखील झाडे लावली आहेत. वृक्षारोपनाच्या बाबतीत संस्था व व्यक्ती या ग्रुपचा सल्ला आवर्जुन घेत असतात. वन व वनीकरण खात्याचे अधिकारी, पर्यावरणप्रेमी उद्योजक या सारख्या अनेक घटकांनी या चळवळीत सहकार्य केले आहे. या चळवळीत विदेशातील काही भारतीय व अन्य नागरिक सहभागी झाले आहेत. विदेशात देखील ही हिरवाईची चळवळ पोचल्याने सोलापुरकराच्या पर्यावरण प्रेमींनी नवा टप्पा गाठता आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com