
Solapur Crime News : कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ
सोलापूर : कोरोनाच्या काळात घाईगडबडीत अनेकांनी मुलींचे विवाह उरकले. पण, आता विवाहात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, व्यवसाय टाकायचा आहे, कर्ज फेडायचे आहे, नवीन गाडी घ्यायची असल्याचे सांगून विवाहितांचा छळ केला जात आहे. अशाच दोन विवाहितांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध पोलिसांत धाव घेतली आहे.
घोंगडे वस्तीतील अश्विनी विरेश बोतल यांचा २१ जून २०१८ रोजी एनजी मिल चाळीतील विरेश बोतल याच्याशी विवाह झाला होता. दोन महिन्यांतच सासरच्यांनी काही ना काही कारण सांगून छळ सुरु केला. शिवीगाळ करीत जाचहाट केला.
अपमानास्पद वागणूक देऊन उपाशीपोटी ठेवले. कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ व मारहाण केली, अशी फिर्याद अश्विनी बोतल यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यावरून पती विरेश, सासरा सिद्राम बोतल, सासू कमलाक्षी बोतल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक ढोबळे तपास करीत आहेत.
दुसरीकडे होटगी रोडवरील सहारा नगरातील यास्मीन दबीरअली शेख यांनी पतीसह सासरच्यांविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. १३ जून २०२१ रोजी यास्मीन यांचा दबीरअली याच्याशी विवाह झाला होता.
विवाहानंतर तीन-चार महिन्यांतच सासरच्यांनी यास्मीनचा छळ सुरू केला. कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आण, नाहीतर सोडचिठ्ठी दे, अशी धमकी पतीने यास्मीनला दिली. तु आमच्या घरात येवू नकोस म्हणून हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार मणुरे तपास करीत आहेत. कर्ज रुपाने घेतलेले पैसे परत देण्यासाठी विवाहीतांचा छळ वाढत असून त्यावरुन तक्रारी वाढत आहेत.
मुलगा पाहिजे होता, झाली मुलगी
‘आम्हाला मुलगा पाहिजे होता, पण तुला मुलगीच झाली. तु आता आमच्या घरात येवू नकोस’ म्हणून पतीसह सासरच्यांनी यास्मीनचा मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी पती दबीरअली फहीम शेख, सासू शहेनाज फहीम शेख, सासरा फहीम अजीज शेख, दिर जैदअली शेख, नणंद दुरपशा फहीम शेख यांच्याविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.