
मळेगाव(सोलापूर): येथील लेखक, चित्रकार व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विशाल गरड यांच्या ऑनलाइन शिवव्याख्यानाला जगातील पाच देशांमधून शिवप्रेमी व अभ्यासकांनी जोरदार दाद दिली आहे.
कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते तथा बार्शी तालुक्याचे सुपुत्र प्रा. विशाल गरड यांचा आवाज शिवव्याख्यानातून सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीन येथील शार्लट मराठी मंडळाच्या वतीने "शिवराय समजून घेताना' या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विशाल गरड यांचे ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले.
हेही वाचाः .....अखेर महानगरपालिकेतील करभरणा केंद्र सूरू
हे व्याख्यान अमेरिकेसह कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड या देशांतही ऑनलाइन पाहण्यात आले. जगभरातून सुमारे दोन हजारांहून अधिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाइव्ह आस्वाद घेतला. "शिवराय समजून घेताना' हा विषय मांडताना प्रा. गरड यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग आणि घटना सांगून त्यातून आजच्या पिढीने काय बोध घेतला पाहिजे, हे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर पोचणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवराय हे विश्वाला वंदनीय का आहेत, हे देखील त्यांनी राजमुद्रेचे उदाहरण देऊन समजून सांगितले. छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे ठराविक प्रसंग नसून तो विचारांचा समुद्र आहे. छत्रपती शिवरायांची युद्धनीती व कूटनीती, वास्तुकला, शिल्पकला, महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांविषयी व रयतेविषयी असणारी आस्था, संघटन कौशल्य, जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण यासारखे विविध तत्त्वे संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत.छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी विशद केले. विशाल गरड यांनी लॉकडाउन काळातील भीषण वास्तव तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या वेदना, लग्नाचा खर्च टाळून पूरग्रस्तांना केलेली आर्थिक मदत, रिंडगुड आणि मुलूखगिरी पुस्तकाचे लेखन यासह त्यांची अनेक व्याख्याने गाजली आहेत. शेकडो शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना केलेले स्पर्धा परीक्षाविषयक व करिअर मार्गदर्शन आदी उपक्रम त्यांनी राबवले.
चित्राच्या व कवितेच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या संदर्भात केलेली जागृती, वृक्षारोपण यामुळे विशाल गरड यांचा विविध क्षेत्रांतील उत्तुंग कार्याचा दृष्टिकोन किती "विशाल' आहे हे यावरून समजते. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील गरड यांच्या चित्रांची दखल घेत त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. अशा प्रकारे विचारांचा जागर घराघरात पोचवणाऱ्या पांगरीच्या सुपुत्राने आपल्या शैलीदार व खुमासदार वाणीने पाश्चिमात्य देशात शिवव्याख्यान गाजवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.