esakal | 31 वर्षांत चौथ्यांदा भरला हिप्परगा तलाव! नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Hipparga Lake

31 वर्षांत तलाव चौथ्यांदा 100 टक्‍के भरल्याचा अनुभव शाखा अभियंता शिरीष जाधव यांनी सांगितला.

सोलापूर: 31 वर्षांत चौथ्यांदा भरला हिप्परगा तलाव

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: शहराजवळील हिप्परगा तलाव 100 टक्‍के भरला असून बसवेश्‍वर नगर, अवंती नगर, जुना कारंबा नाका, देगाव, डोणगाव, वसंत विहार, पांढरे वस्ती, मडकी वस्ती परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी तलावाची पाहणी केली. दरम्यान, 31 वर्षांत तलाव चौथ्यांदा 100 टक्‍के भरल्याचा अनुभव शाखा अभियंता शिरीष जाधव यांनी सांगितला.

हेही वाचा: हिप्परगा तलाव सुशोभिकरणासाठी लोकसहभागावर भर 

सोलापूर शहरासह परिसरातील नागरिकांची तहान भागावी, शेतीलाही पाणी मिळावे या हेतूने 1868 मध्ये आदिला नदीवर हिप्परगा तलाव उभारला. 1871 रोजी तलावाचे काम पूर्ण होऊन तलावात पाणी यायला सुरवात झाली. त्यानंतर 1990, 1998, 2020 आणि 2021 मध्ये हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. तलावाची पाणीसाठवण क्षमता 3.32 टीएमसी असून सध्या तलावात 2.15 टीएमसी पाणी मावते. तलावातून सांडव्याद्वारे येणारे पाणी ओढ्यातून शहराजवळून वाहून जाते. बेलाटीच्या पुढे तो सांडवा सीना नदीला जाऊन मिळतो. मंगळवारी (ता. 28) सायंकाळी सहा वाजल्यापासून सांडव्यातून थोड्या प्रमाणात पाणी ओढ्यातून खाली जात होते. दरम्यान, आतापर्यंत तलावातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे शहराला कोणताही फटका बसलेला नाही. ओढ्याच्या परिसरातील नागरिकांना इतरत्र हलविण्याची वेळ आली नाही. परंतु, अतिवृष्टी झाल्यास निश्‍चितपणे तसा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना नोटीस देऊन सतर्कतेचा इशारा दिल्याचेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: हिप्परगा तलाव पर्यटकांना घालतोय साद ; देशी व विदेशी पक्षांचा अधिवास 

तलावात 1.16 टीएमसी गाळ

मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडल्याने हिप्परगा तलाव 100 टक्‍के भरला आहे. तलावात सध्या 2.15 टीएमसी पाणी आले आहे. तलावाची क्षमता 3.32 टीएमसी आहे, परंतु तलावात 1.16 टीएमसीपर्यंत गाळ साचलेला आहे. अजूनपर्यंत तो काढण्यात आला नसून त्यासाठी निधी नसल्याचेही बोलले जात आहे. तलावातील गाळ काढल्यास शहर परिसरातील नागरिकांना धोका होणार नाही. सध्या जुना कारंबा नाका व पुना नाका परिसरातील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने तिथून पुढे जाणारी वाहतूक बंद केल्याचेही सांगण्यात आले.

loading image
go to top