पोखरापूर येथील ऐतिहासिक विठ्ठल बिरुदेव यात्रा रद्द; वाचा धनजी विठोबाची प्रचलित आख्यायिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal birudev

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोखरापूर येथील धनजी विठोबा देवस्थानची यात्रा रद्द करीत मानकरी व पुजाऱ्यांसह अवघ्या दहा जणांना यात्रा काळातील पारंपरिक पूजाअर्चा विधी करण्याची परवानगी पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. 

पोखरापूर येथील ऐतिहासिक विठ्ठल बिरुदेव यात्रा रद्द; वाचा धनजी विठोबाची प्रचलित आख्यायिका

मोहोळ (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोखरापूर येथील धनजी विठोबा देवस्थानची यात्रा रद्द करीत मानकरी व पुजाऱ्यांसह अवघ्या दहा जणांना यात्रा काळातील पारंपरिक पूजाअर्चा विधी करण्याची परवानगी पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवी-देवतांच्या यात्रा व जत्रासंदर्भात महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यासाठी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोखरापूर येथील धनजी विठोबाचे पुजारी, मुख्य मानकरी, सरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये पोलिस निरीक्षक सायकर यांनी उपस्थितांना दिवाळी पाडव्याच्या दिवशी होणारी मुख्य यात्रा रद्द करण्यात आली आहे, असे सांगत सुरक्षिततेच्या दृष्टीने ठरवून दिलेल्या दहा जणांना मूर्तीसह विधिवत पूजा करण्यास परवानगी दिली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले. याच वेळी शासनाच्या सूचनांची दखल न घेणाऱ्यास कायद्याचा बडगा सहन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

या वेळी पोलिस गुप्त विभागाचे नीलेश देशमुख, देवस्थानचे पुजारी हणमंत वाघमोडे, धनाजी वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, ग्रामसेवक डी. एस. वाघमारे, सरपंच चेतन नरुटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल कदम, पंचायत समिती सदस्य सिंधू वाघमारे, माजी सभापती यशवंत नरुटे, श्रीधर उन्हाळे, धोंडिराम लेंगरे, बाबासाहेब दळवे- पाटील, हर्षल दळवे, पिंटू काळे, आशीष काळे, रामकृष्ण दळवे, मधुकर वाघमोडे आदी उपस्थित होते. 

धनजी विठोबाची प्रचलित आख्यायिका 
पोखरापूर धनजी विठोबाचे पुजारी धनाजी वाघमोडे यांच्याशी "सकाळ' प्रतिनिधीने संपर्क साधत या देवस्थानविषयी अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, की या ठिकाणी दिवाळी पाडव्याच्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे धनगर समाजाचे दैवत बिरोबा पट्टनकोडोलीचे (जि. कोल्हापूर) व भक्त खेलोबा अंजनगाव (ता. माढा, जि. सोलापूर) या गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा. याबाबत अशी आख्यायिका प्रचलित आहे, की अगदी अलीकडील काळातील बिरोबाचे भक्त म्हणजे अंजनगावचे खेलोबा. आपल्या भक्ताला इतक्‍या दूरवर भेटायला येणे वारंवार शक्‍य नसल्यामुळे प्रत्यक्ष बिरोबाच दंडीच्या माळावर येतात. (पोखरापूर येथील याच ठिकाणाला दंडावर असा शब्द सध्या प्रचलित आहे.) तर दंडी या शब्दाला धनजी हा शब्द रूढ झाला असावा. 

दिवाळी पाडव्या दिवशीच्या या यात्रेत भंडाऱ्याची उधळण करीत होणारी गुरू-शिष्य भेट, परज, भाकणूक पाहण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतून हजारो भक्तगण उपस्थित असतात. परंतु कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे बिरोबा -खेलोबाच्या कोणत्याही भक्ताला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय मान्य करीत मोजक्‍याच मानकरी व पुजाऱ्यांसह विधिवत पूजाअर्चा करण्याचे निश्‍चित झाले आहे. तरी भक्तगणांनी आपापल्या घरूनच बिरोबा- खेलोबाची आराधना करावी, असे आवाहन पुजारी धनाजी वाघमोडे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top