esakal | कोरोना : इतिहासात प्रथमच चैत्री यात्रेत पंढरी सुनीसुनी
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal

कोरोनाच्या संकटामुळे सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेली चैत्री यात्रा भरणार किंवा नाही, याविषयी वारकऱ्यांमध्ये गेल्या महिन्यापासून उत्सुकता होती. प्रशासनाने आणि आणि प्रमुख महाराज मंडळींनी कोरोना विषाणूंचा संसर्ग गर्दीमुळे होऊ नये यासाठी चैत्री यात्रेला वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन केले होते. या आवाहनाला लाखो वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

कोरोना : इतिहासात प्रथमच चैत्री यात्रेत पंढरी सुनीसुनी

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या चैत्री यात्रेला यंदा कोरोना संकटामुळे वारकरी भाविक पंढरीला येऊ शकलेले नाहीत. दरवर्षी यात्राकाळात वारकऱ्यांच्या गर्दीमुळे पंढरीत येणारा भक्तीचा महापूर यंदा पाहायला मिळत नाही. मात्र, लाखो वारकऱ्यांच्या वतीने स्थानिक फडकरी, मठाधिपती आणि महाराज मंडळींनी शासनाच्या नियमांचे पालन करत आपापल्या मठातून पंढरीनाथाची सेवा परंपरेप्रमाणे सुरू ठेवली आहे. सुरक्षित अंतर ठेवत अगदी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत चैत्री एकादशीची नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे.

हेही वाचा - आव्हाड-देशमुखांमध्ये कलगीतुरा

पंढरीच्या अर्थकारणात महत्त्वाची चैत्री यात्रा
कोरोनाच्या संकटामुळे सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेली चैत्री यात्रा भरणार किंवा नाही, याविषयी वारकऱ्यांमध्ये गेल्या महिन्यापासून उत्सुकता होती. प्रशासनाने आणि आणि प्रमुख महाराज मंडळींनी कोरोना विषाणूंचा संसर्ग गर्दीमुळे होऊ नये यासाठी चैत्री यात्रेला वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये असे आवाहन केले होते. या आवाहनाला लाखो वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरवर्षी यात्रेसाठी येणारे वारकरी यंदा पंढरीत आलेले नाहीत. त्यामुळे इतिहासात प्रथमच श्री विठ्ठल मंदिर परिसर यात्राकाळात सुनासुना पाहायला मिळत आहे. पंढरीच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेली चैत्री यात्रा न भरल्यामुळे स्थानिक व्यापारी मात्र चिंतेत आहेत.

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होईल
या पार्श्‍वभूमीवर "सकाळ' प्रतिनिधीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर, श्री संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज आणि वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत तथा राणा महाराज वासकर यांच्याशी संवाद साधला तेव्हा या सर्वांनी चैत्री यात्रा रद्द झालेली नसून केवळ सद्य परिस्थितीमुळे पंढरपुरात यात्रेच्या निमित्ताने गर्दी न करण्याचे आवाहन आम्ही सर्वांनी वारकऱ्यांना केले होते. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होईल आणि त्यानंतर वारकरी भाविकांनी नेहमीप्रमाणे पंढरीला यावे अशा भावना व्यक्त केल्या.

कोरोनाचे संकट दूर झाल्यावर सर्वांनी पंढरीत यावे
संत तुकाराम महाराजांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर म्हणाले, याचा धरीन अभिमान करिन आपुले जतन, या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे चैत्री वारी सर्व वारकऱ्यांच्या वतीने आम्ही पंढरपूरमधील महाराज मंडळी, फडकरी, दिंडी मालक, मठाधिपती असे सर्वजण मिळून पार पाडत आहोत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर सर्वांनी पंढरीत यावे. आपण सर्वजण मिळून पंढरीनाथाची आराधना करू, नामसंकीर्तन करू.

नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा
श्री संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज म्हणाले, दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असला तरी परंपरेप्रमाणे याही वारीला पंढरपुरातील सर्व फडांवर नियमांचे पालन करत परंपरेप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. परंपरा जोपासली जात आहे. वारकऱ्यांचा नियम केव्हाही खंडित होत नाही. तुकोबाराय जसे सांगतात, पडता जड भारी नेमा न टाळे निर्धारी, त्याप्रमाणे भगवंताचे नामचिंतन फडांवर परंपरेप्रमाणे होतच आहे. ते एकट्याने केले काय आणि असंख्य लोकांनी केले काय त्याचे फळ एकच मिळणार आहे. त्यामुळे जे वारकरी पंढरपूरला वारीला येऊ शकले नाहीत त्यांनी खेद वाटून घेऊ नये. वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर म्हणाले, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, या उक्तीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरसुद्धा वारकरी संप्रदायाने संप्रदायाचा नियम बंद न ठेवता चालूच ठेवलेला आहे. रामनवमीचा जन्मोत्सव, दशमीची कीर्तनसेवा एकादशीची नगरप्रदक्षिणा ही सामूहिक न होता मठाधिपती, फडप्रमुख, दिंडीप्रमुख अशा सर्वांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात केली जात आहे.

दीडशे ते दोनशे टन फुलांनी गाभाऱ्याची सजावट
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी म्हणाले, कोरोनामुळे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर जरी भाविकांसाठी बंद असले तरी परंपरेप्रमाणे नित्योपचार सुरू आहेत. उद्या, शनिवारी माघ एकादशी दिवशी नियमांचे पालन करत मंदिरात कीर्तनसेवा होणार आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या गाभाऱ्यात सुमारे 150 ते 200 टन गुलाब फुलांचा वापर करून आकर्षक सजावट केली जाणार आहे. एकादशीची विठुरायाची नित्य पूजा, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वातावरण भक्तिमय होण्यासाठी मंदिरावरील ध्वनिक्षेपकावरून एकादशीच्या निमित्ताने दिवसभर अभंग लावले जाणार आहेत.

loading image
go to top