
सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती विस्कटल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर वसुलीची वाट पाहावी लागत आहे. दुसरीकडे जीएसटी व एलबीटी अनुदानातूनही पगार द्यावे लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्चात 50 टक्के बचत व्हावी म्हणून महापालिका आयुक्तांनी झोन कार्यालयातील दोनशे सफाई कर्मचारी घरी बसविले. आता डाटा ऑपरेटरची माहिती मागविली असून सुमारे 100 ऑपरेटरना आता घरचा रस्ता दाखविला जाणार आहे.
महापालिकेला स्थानिक संस्था कर, कर आकारणी, गलिच्छ वस्ती सुधार, हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगरअभियंता, आरोग्य खाते, आठ झोन कार्यालये, सामान्य प्रशासन विभाग, हुतात्मा स्मृती मंदिर, क्रीडा विभाग, विधान सल्लागार आणि अभिलेखापाल या विभागांच्या माध्यमातून दरवर्षी साडेसहाशे कोटींचा कर वसूल होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील तीन वर्षांत उद्दिष्टाच्या तुलनेत एक हजार कोटींची तूट महापालिकेला सोसावी लागली आहे. आता कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात दरमहा 30 ते 34 कोटींची घट आली असून एप्रिल ते सप्टेंबरअखेर महापालिकेला 29 कोटी रुपयांचा कर मिळाला आहे.
दुसरीकडे मात्र, पगारीपोटी सहा महिन्यांत 84 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. महापालिकेला एप्रिल ते सप्टेंबर या काळात 114 कोटी 78 लाखांचे जीएसटी व एलबीटी अनुदान मिळाले आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन भागविले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता आयुक्तांनी अनावश्यक कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचा धडाका लावला आहे. डाटा ऑपरेटरला दरमहा साडेअकरा हजार रुपयांचे मानधन दिले जाते. अनावश्यक डाटा ऑपरेटरला कमी केल्यानंतर दरमहा दहा लाखांची बचत होईल, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कामाच्या मासिक अहवालानंतरच पगार
शहरातील आठ झोनअंतर्गत विविध नगरांमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहाशेहून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. तरीही झोन कार्यालयांमध्ये काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना कमी करण्यात आले आहे. मात्र, एकाच कामासाठी अनेक कर्मचारी ठेवण्याची सद्य:स्थिती नसल्याचे कारण महापालिका अधिकाऱ्यांनी पुढे केले आहे. आता झोन कार्यालयातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पगार बिले काढणाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटीच काम असते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आता अन्य कामांची जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यांच्या कामाचा अहवाल दरमहा दिल्यानंतरच पगार काढला जाईल, असा सूचक इशाराही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे.
उत्पन्नांच्या तुलनेत आस्थापनावरील खर्च अधिक
महापालिकेला दरवर्षी तीनशे कोटींचे उत्पन्न मिळते आणि दुसरीकडे आस्थापनावरच त्यातील दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने अनावश्यक ठिकाणी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका
यावर्षी महापालिकेला मिळालेले उत्पन्न
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.