१५- १८ तास घरीच केला अभ्यास! आईच्या पाठबळाने स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sneha pulujkar
१५- १८ तास घरीच केला अभ्यास! आईच्या पाठबळाने स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

१५- १८ तास घरीच केला अभ्यास! आईच्या पाठबळाने स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

सोलापूर : आई उज्ज्वला पुळूजकर या जिल्हा आरोग्य विभागात शिपाई तर वडील सुनील पुळूजकर हे देखील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शिपाईच. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी भाड्याच्या घरात राहून तीन मुलांच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. एक मुलगा वकील आणि दुसरा इंजिनिअर झाला. पण, आईला मुलीकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या दृष्टीने स्नेहाची वाटचाल सुरु होती. पगार कमी असल्याने पोटाला चिमटा घेऊन मेहनत करणाऱ्या आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी स्नेहा या जिद्दीला पेटल्या आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी न्यायाधीश पदाला गवसणी घातली.

सोलापुरात अनेक वर्षांपासून सुनील पुळूजकर (रा. शेळगी, सोलापूर) यांच्या कुटुंबाचा भाड्याच्या घरातच संसार सुरू होता. त्यांना सुजित, सुयश व स्नेहा अशी तीन मुले. आई-वडिलांनी स्वत:चे घर विकत घेण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाला पहिले प्राधान्य दिले. आई-वडिलांचे संस्कार व शिकवणुकीवर दोन्ही मुलांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबातील स्नेहाची न्यायाधीश होण्याकडे वाटचाल सुरु होती.

पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण स्नेहाने सेवासदन प्रशालेतून पूर्ण केले. दहावीत ९३ टक्के गुण मिळवले आणि अकरावी-बारावी दयानंद विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. भावांप्रमाणे आपणही उच्च शिक्षण लवकर पूर्ण करून नोकरी करावी, या हेतूने तिने ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये स्नेहाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले.

त्यानंतरही तिचे समाधान झाले नाही आणि तिने छोट्या भावाप्रमाणे दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अंतिम वर्षात असताना तिने ‘एमपीएससी’ची तयारी सुरू केली. ॲड. ए. बी. अंदोरे, ॲड. सत्यनारायण माने, ॲड. गणेश पवार यांनी तिला मदत केली. आई-वडील ड्यूटीवर गेल्यावर घरातील कामे स्नेहाच करायची. तिला आईनेही मदत केली. पण, घरकामापेक्षाही अभ्यासासाठी आईने तिला नेहमीच पाठबळ दिले.

स्नेहा करायची दररोज १५ ते १८ तास अभ्यास

महागडी पुस्तके व कोचिंग क्लास लावून शिकण्यासारखी स्नेहा यांची तेवढी आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती. त्यामुळे स्नेहा यांनी घरातच दररोज १५ ते १८ तास अभ्यास केला आणि स्वत: नोट्‌स काढल्या. कधीकधी आई देखील त्यांच्यासोबत थांबायची. अखेर स्नेहा यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. आता जूनमध्ये स्नेहा यांचे प्रशिक्षण सुरु होईल.

आईच्या स्वप्नपूर्तीसाठी स्नेहाची रात्रंदिवस मेहनत

शिपाई म्हणून काम करणाऱ्या आई-वडिलांना आपल्या साहेबांप्रमाणे आपली मुलेही तशीच साहेब व्हावीत, असे स्वप्न वाटायचे. त्या दृष्टीने त्यांनी स्नेहाला बळ दिले. पण, मुलीचे वय वाढत असल्याने अजून किती शिकवणार, तिचा विवाह करा, असे नातेवाईक सल्ला देत होते. अशावेळी स्नेहा यांच्या आईने त्याकडे दुर्लक्षच करीत स्नेहा यांना अभ्यासासाठी पाठबळ दिले. रेल्वेत ‘लोकोपायलट’ परीक्षेत यश मिळूनही डोळ्यावरील चष्म्यामुळे स्नेहा यांना मेडिकलमधून माघारी परतावे लागले होते. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी मानून आईने स्नेहाच्या स्वप्नांना हिंमतीचे पंख दिले आणि अखेर तो दिवस उजाडला, स्नेहा ‘एमपीएससी’तून न्यायाधीश झाल्या.