esakal | ...तर निकाल वेगळा दिसला असता ! ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष अन्‌ नडला अतिआत्मविश्वास

बोलून बातमी शोधा

Pawar_Bhalke

...तर निकाल वेगळा दिसला असता ! ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष अन्‌ नडला अतिआत्मविश्वास

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता पराभवाच्या कारणांची मीमांसा सुरू झाली आहे. दिवगंत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या पत्नी जयश्री भालके यांना पक्षाने उमेदवारी दिली असती तर ही जागा राष्ट्रवादीला कायम राखता आली असती, असे मत आता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे. (Ignoring the suggestions of the seniors Bhagirath Bhalke lost the by election)

राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्षांची राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव हा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून पराभवाच्या कारणांचा शोध आणि बोध घेण्याचे काम सुरू आहे. दिवगंत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली असती तर निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता, अशी मतं अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत.

हेही वाचा: डोळ्यांदेखत जळताहेत पिके, तरीही "नीरा'चे मिळेना आवर्तन ! अधिकारी नॉट रिचेबल

भारत भालके यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण? याविषयी फारशी चर्चा झाली नसली तरी बहुतांश निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जयश्री भालकेंनाच विधानसभेची उमेदवारी देणे हे पक्षासाठी अधिक सोयीचे होणार असल्याची भावना निवडणुकीपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील जयश्री भालकेंच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतु काही स्थानिक नेतेमंडळींनी ज्येष्ठांच्या मतांचा विचार न करता, भगीरथ भालकेंना उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे आग्रह धरला.

हेही वाचा: निवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा ! भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान

उमेदवारी कोणाला द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पंढरपुरात येऊन कार्यकर्त्यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यामध्ये देखील अनेक ज्येष्ठांनी जयश्री भालकेंच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. परंतु ज्येष्ठांच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करत अतिआत्मविश्वासाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भगीरथ भालकेंचे नाव जाहीर केले. तरीही पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील दिवगंत आमदार भारत भालकेंच्या प्रेमापोटी आणि सहानुभूती म्हणून भगीरथ भालकेंना जवळपास 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली. यामध्ये समाधान आवताडे यांनी अवघ्या 3 हजार 733 मतांनी बाजी मारली. अटीतटीच्या या लढतीमध्ये भगीरथ भालकेंचा निसटत्या मतांनी पराभव झाला. निकालानंतर आता भगीरथ ऐवजी जयश्री भालकेंना उमेदवारी दिली असती तर त्या विजयी झाल्या असत्या, अशी हुरहूर कार्यकर्त्यांना लागली आहे.