निवडणुकीच्या रिंगणात या, मग दंड थोपटा ! भगीरथ भालकेंचं परिचारकांना थेट आव्हान

भगीरथ भालके यांनी दिले प्रशांत परिचारक यांना दिले थेट आव्हान
Bhalke_Paricharak
Bhalke_ParicharakCanva

पंढरपूर (सोलापूर) : एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला, असा सवाल करत, आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतः लढा आणि मग थंड थोपटा, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकांना दिले. त्यानंतर आता भालके - परिचारक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. (Bhagirath Bhalke gave a direct challenge to MLA Prashant Paricharak)

Bhalke_Paricharak
"आमचं ठरलंय ! काय ठरलं होतं हे आता संजयमामांनीच सांगावं !'

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी (ता. 2) जाहीर झाला. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दंड थोपटा, अशी आमदार परिचारकांना साद घातली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहात दंड थोपटले. आमदार प्रशांत परिचारकांनी दंड थोपटल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. यावरून सोमवारी लागलीच पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी आमदार परिचारकांवर आगपाखड करत निशाणा साधला.

या वेळी भालके म्हणाले की, पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने भरभरून प्रेम केले आहे. जवळपास 1 लाख 5 हजार 717 मते देऊन मला विजयाच्या जवळपास पोचवले. काही चुकांमुळे निसटता पराभव झाला आहे. तरीही न खचता, नव्या उमेदीने आजपासून लोकांच्या कामासाठी मी बाहेर पडलो आहे. झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळींचा सल्ला घेऊनच यापुढे मी वाटचाल करणार आहे.

Bhalke_Paricharak
पर्यावरणाचे आरोग्य जपणारे "ट्री-मॅन' डॉ. गुजरे !

रविवारी आमदार प्रशांत परिचारकांनी शिवाजी चौकात दंड थोपटून बदला घेतल्याचे दाखवून दिले आहे. हयात नसणाऱ्या एखाद्या नेत्याचा बदला म्हणून जर तुम्ही दंड थोपटणार असाल तर लोकांना कदापिही रुचणारे नाही. विजय कोणाचा आणि दंड कोण थोपटतंय, अशी परिचारकांची खिल्लीही त्यांनी उडवली. एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीच्या रिंगणात येऊन दंड थोपटले असते तर लोकांनी स्वीकारले असते. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः या आणि मग दंड थोपटा, तुमचा दंड थोपटण्याचा क्षण बघण्याची जनता देखील वाट बघतेय, असा सल्ला वजा टोलाही भालकेंनी आमदार परिचारकांना लगावला.

काय आहे दंड थोपटण्यामागची राजकीय पार्श्वभूमी?

माजी आमदार औदुंबर पाटील यांचे पुत्र राजाभाऊ पाटील यांनी 1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात बंडखोरी करत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या वेळी औदुंबर पाटील हे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. एकीकडे मुलाची बंडखोरी तर दुसरीकडे पक्षशिस्त, अशा कात्रीत ते अडकले होते. परंतु राजकीय तत्त्वनिष्ठ आणि शरद पवार यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या औदुंबर पाटील यांनी पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच्या मुलाविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा त्यांनी प्रचार केला होता. त्या वेळी परिचारकांना निवडून आणण्यात औदुंबर पाटील यांचा मोठा वाटा होता. तरीही परिचारकांनी त्यांच्यावर पुत्रप्रेमाचा आरोप केला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार सुधाकर परिचारक हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्या वेळी सुधाकर परिचारकांनी शरद पवार यांच्यासमोर शड्डू मारत, तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय, अशी खोचक टिप्पणी केली होती. त्यांचीही खोचक टिप्पणी औदुंबर पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना असह्य झाली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत पाटील विरुद्ध परिचारक या दोन गटांत निवडणुका झाल्या.

2019 च्या निवडणुकीत थेट सुधाकर परिचारक विरुद्ध (कै.) औदुंबर अण्णा पाटील यांचे शिष्य भारत भालके यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भारत भालके यांनी सुधाकर परिचारकांचा धक्कादायक परावभ केला. त्यानंतर 25 वर्षांपूर्वी पवारांसमोर श्नड्डू ठोकणाऱ्या परिचारकांचा पराभव केल्यानंतर भारत भालकेंनी शिवाजी चौकात दंड थोपटून 25 वर्षांपूर्वीचा वचपा काढला होता. आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. रविवारी निकालही लागला. या वेळी मात्र परिचारकांनी भालकेंचा राजकीय बदला घेण्यासाठी समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला. अटीतटीच्या या लढतीमध्ये आवताडे यांनी (कै.) भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा पराभव केला. भारत भालकेंनी मागील दीड वर्षापूर्वी थोपटलेल्या दंडाचा बदला म्हणून काल आमदार प्रशांत परिचारकांनीही भालकेंच्या विरोधात दंड थोपटून मागील राजकारणाचा वचपा काढला, अशी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com