एसटी संपाचा 'कार्तिकी'वर परिणाम! उलाढाल ठप्प; खासगी वाहने, रेल्वेचाच आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी संपाचा 'कार्तिकी'वर परिणाम! उलाढाल ठप्प; खासगी वाहने, रेल्वेचाच आधार

एसटी संपाचा 'कार्तिकी'वर परिणाम! उलाढाल ठप्प; खासगी वाहने, रेल्वेचाच आधार

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. सुमारे वीस महिन्यानंतर कार्तिकी यात्रा भरत आहे. परंतु नेमके कार्तिकी यात्रेच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्याने कार्तिकी यात्रेवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गेल्या आठ दिवसात अपेक्षेच्या तुलनेत केवळ 25 ते 30 टक्केच व्यापार झाल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

सुमारे वीस महिन्यानंतर यंदा कार्तिकी यात्रा भरत आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रेच्या आठ दिवसाच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी येतील असा अंदाज व्यक्त झाला होता. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अपेक्षित संख्येने वारकरी पंढरपुरला येऊ शकलेले नाहीत. खासगी वाहनातून आणि काही प्रमाणात रेल्वेने वारकरी येत आहेत परंतु दरवर्षी कार्तिकी नवमी दिवशी मंदिर परिसर आणि शहराच्या सर्व भागात जिकडे पहावे तिकडे कपाळी गंध, हाती भगवी पताका घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी पहायला मिळत असतात यंदा मात्र तुलनेने वारकरी भाविकांची गर्दी खूप कमी दिसत आहे. यात्रेवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा लक्षणीय परिणाम झाल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वीस महिन्यांपासून पंढरपुरात कोणतीही यात्रा भरु शकली नव्हती. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दक्षता म्हणून श्री विठ्ठल मंदिर देखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविक पंढरपूरला येणे बंद झाले होते. सहाजिकच बाजारपेठेवर फार मोठा परिणाम झाला होता. भाविकांच्या माध्यमातून होणारी उलाढाल ठप्प झाल्याने प्रासादिक वस्तूंसह अनेक लहान मोठे व्यापारी अडचणीत आले होते.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने निर्बंध कमी केले. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनास अद्याप परवानगी दिलेली नसली तरी मुखदर्शनास भाविकांना प्रवेश दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतील. चांगला व्यापार होईल अशी व्यापाऱ्यांना आशा होती. परंतु एसटी कर्मचारी संपामुळे कार्तिकी यात्रेसाठी दरवर्षी प्रमाणे वारकरी भाविक पंढरपूरला येऊ शकलेले नाहीत. कार्तिकी नवमी दिवशी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग गर्दीने फुलून जात असतो. परंतु यंदा मात्र तुलनेने गर्दी खूप कमी दिसत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने खासगी वाहनातून आणि काही प्रमाणात रेल्वेतून भाविक दाखल होऊ लागले आहेत. परंतु आलेले भाविक पंढपुरात मुक्कामासाठी न थांबता दर्शन झाल्यावर लगेच परतीच्या प्रवासाला निघत आहेत. प्रासादिक वस्तूंचे व्यापारी राजाभाऊ वट्टमवार आणि पेढ्याचे प्रसिध्द व्यापारी ज्ञानेश्वर देशपांडे म्हणाले, एसटीच्या संपामुळे यात्रेसाठी गेल्या आठ दिवसात जेवढे भाविक पंढपुरात येणे अपेक्षित होते. तेवढे आलेले नाहीत. खासगी वाहनातून पंढरपूरला येण्यासाठी भाविकांना एसटीच्या तुलनेत जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे पंढरपूरला आलेले भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन झाले की, अगदी अत्यल्प प्रमाणात खरेदी करुन परतीच्या प्रवासाला निघत आहेत. त्यामुळे कार्तिकी यात्रेतील विक्रीचा विचार केला तर केवळ तीस ते चाळीस टक्के इतकीच उलाढाल झाली आहे.

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

अनेक स्थानिक लोकांनी भाविकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. यात्रेत भाविकांना या खोल्या राहण्यास देतात परंतु यात्रेसाठी अपेक्षित गर्दी झालेली नसल्याने त्यांच्यावर ही परिणाम झाला आहे.

सोलापूरी चादरी आणि घोंगडीचे व्यापारी राजाभाऊ उराडे, बांगडीचे व्यापारी दादासाहेब जगधने म्हणाले, कार्तिकी यात्रा भरवली जाणार आहे का नाही याची प्रशासनाकडून पुरेशी आधी माहिती दिली गेली नाही. त्यामुळे माल मागवायचा का नाही अशी व्यापाऱ्याची व्दिधा अवस्था झाली होती. यात्रा चांगली भरेल या आशेने सर्व व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी माल आणला आहे. परंतु एसटी संपामुळे गेल्या आठ दिवसात अपेक्षित विक्री झालेली नाही.

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज देखील पत्राशेड पर्यंत न गेल्याने भाविकांना अवघ्या दोन तासात मुखदर्शन घेता येत आहे. यात्रेत एका मिनिटात केवळ 30 ते 40 भाविकांचे पदस्पर्श दर्शन होते. सध्या गर्दी कमी आहे आणि पदस्पर्श दर्शनाऐवजी केवळ मुखदर्शन सुरु आहे. त्यामुळे अवघ्या दोन ते अडीच तासात मुखदर्शन करुन भाविक मंदिरातून बाहेर पडत आहेत.

loading image
go to top