esakal | Solapur : झेडपी अध्यक्षांच्या खांद्यावर 'ओझे' कोणाचे?
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपी अध्यक्षांच्या खांद्यावर 'ओझे' कोणाचे?

अध्यक्षांच्या खांद्यावर 'ओझे' कोणाचे? या प्रश्‍नाचे उत्तर जोपर्यंत शोधले जात नाही, तोपर्यंत पडद्यामागचा सूत्रधार समोर येणार नाही.

झेडपी अध्यक्षांच्या खांद्यावर 'ओझे' कोणाचे?

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लाच आणि हुंडा एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. लाच आणि हुंड्यात देणारा आणि घेणारा खुष असेल तर विषय बाहेर जात नाही. देण्या-घेण्यातून फिस्कटले की हा मामला चारचौघात पोचतो. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Zilla Parishad President Aniruddha Kamble) आणि कृषी सभापती अनिल मोटे (Anil Mote) यांच्यातील हा मामला आता चारचौघात झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या "लाव रे तो व्हिडिओ' या वाक्‍याचा प्रत्यय आता जिल्हा परिषदेत (Solapur ZP) खऱ्या अर्थाने येऊ लागला आहे. अध्यक्षांच्या खांद्यावर 'ओझे' कोणाचे? या प्रश्‍नाचे उत्तर जोपर्यंत शोधले जात नाही, तोपर्यंत पडद्यामागचा सूत्रधार समोर येणार नाही.

हेही वाचा: सोलापुरात गांधीजींची कॉंग्रेस हायंच कुठं..?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत आणि विषय समिती सभापती निवडीत झालेला घोडेबाजार अनेकांनी पाहिला आहे. जेवायला एकासोबत असलेला सदस्य हात धुवायला दुसरीकडे जातो, अशीच परिस्थिती त्या काळात निर्माण झाली होती. त्याकाळी झालेला घोडेबाजार आणि माझ्या बोकांडी साडेचार कोटींचे देणे आहे, हा त्या व्हिडिओमधील संवाद, याचा नक्कीच काही तरी संबंध आहे. झेडपीमध्ये अध्यक्ष व सभापती म्हणून अनेकांनी आतापर्यंत काम पाहिले. त्यांच्यामध्ये मतभेदही होते. परंतु आशा पद्धतीने त्या पदाची उंची कमी करणारी विधानं कधीच कोणी केली नव्हती. अध्यक्ष कांबळे आणि सभापती मोटे येत्या काही महिन्यात त्या पदावरून पायउतार होतील. ते त्या पदावर असताना मात्र त्या पदाला लागलेला डाग हा झेडपीच्या इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात राहील.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ शाळा, सुंदर शाळांच्या माध्यमातून शाळेचा परिसर स्वच्छ करत आहेत. पदाधिकाऱ्यांमधील आरोप- प्रत्यारोपामुळे झेडपीच्या मुख्यालयात मात्र घाण होऊ लागली आहे. अध्यक्ष कांबळे आणि सभापती मोटे हे वेगळ्या पक्षाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारात मतभिन्नता असणे साहजिकच आहे. अध्यक्ष कांबळे आणि अर्थ सभापती विजयराज डोंगरे हे मात्र एकाच पक्षाचे आहेत. तरी देखील त्यांच्यात खटके उडतात, उडालेले खटके चारचौघापर्यंत येतात. झेडपीची सत्ता मिळविणे एकवेळ सोपे आहे परंतु मिळालेली सत्ता धुसफूस न होता चालविणे हे कठीण असल्याचे आता भाजप आणि समविचारी मंडळींच्या लक्षात आले असेल. झेडपीतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी दोन आमदारांनी झेडपीत यायचे, हा निर्णय झाला. काही दिवस अंमलबजावणी झाली, नंतर झेडपीत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असाच अनुभव येऊ लागला आहे.

हेही वाचा: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधी एकही नाही नगरसेवक

चर्चा झाली... कारवाईचे काय?

सभापती मोटे यांनी तो व्हिडिओ दाखवून चर्चा घडवून आणली आहे. गेल्या अनेक महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आत्ताच कसा बाहेर आला? हा व्हिडिओ बाहेर काढण्यासाठी सभापती मोटे यांनी एवढे दिवस कशाची वाट पाहिली? घेरडी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून कर्ज देण्याचा निर्णय झाला आहे. त्या निर्णयाचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? अध्यक्ष कांबळे हे फक्त मुखवटा असतील तर त्यांच्या आडून कोण गल्ला भरतंय? यासह अनेक प्रश्‍नांची उत्तरे आगामी काळात शोधावी लागणार आहेत. सभापती मोटे यांनी आरोप करून या प्रकरणात चर्चा घडविली. अध्यक्षपदाच्या विश्‍वासार्हतेला धक्का लावला. या प्रकरणातील खरा सूत्रधार शोधण्यासाठी सभापती मोटे सनदशीर मार्गाने प्रयत्न करणार का? विषय तडीस नेण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार का? यावर सभापती मोटे यांची विश्‍वासार्हता अवलंबून राहणार आहे.

loading image
go to top