बार्शीत 17 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन 

sahitya digital.jpg
sahitya digital.jpg

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे साहित्य नगरी, बार्शी (सोलापूर) : देशातील भाषा या शेतकऱ्यांच्या मुलांनी तयार केल्या आहेत. प्रत्येक भारतीय भाषेत 'ळ' अक्षर आहे. मात्र संस्कृत भाषेत 'ळ' अक्षर नाही. जे पेरले तेच उगवते. या न्यायानुसार संस्कृत ही मराठीसह कोणत्याही भारतीय भाषेची जननी नाही, असे ठाम मत ज्येष्ठ इतिहास संशोधक शरद गोरे यांनी मांडले. 
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव आयोजित 17 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी गोरे बोलत होते. या संमेलनाचे उद्‌घाटन ह. भ. प.जयवंत महाराज बोधले यांचे हस्ते झाले. व्यासपीठावर डॉ .बी. वाय. यादव, माजी आमदार धनाजी साठे, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पद्माकर कुलकर्णी, सोमेश्वर घाणेगावकर, विलास जगदाळे, शोभाताई घुटे, ह. भ. प. अनंत महाराज बिडवे उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते. 
शरद गोरे म्हणाले की, मराठी ही अभिजातच भाषा आहे. या देशाची ती अनेक वर्षे राज्य भाषा होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा इतिहास देशात आहे. मराठ्यांचे राज्य अटकेपार पोहचले होते. सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक स्थान प्राप्त झाल्याशिवाय राजकीय स्थान मिळत नाही. शेतकऱ्यांच्या इतिहासाचे पुर्नलोकन करा, परिवर्तन करण्याचा संकल्प करा, समाज बदलला पाहिजे, भक्कम उभे रहा, दातृत्व भूमिका जागृत ठेवा, मराठी भाषेचे आवरण काढले पाहिजे, असेही गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 
उद्‌घाटक ह. भ. प. जयंत महाराज बोधले म्हणाले की, साहित्य वास्तवदर्शी असावे. वक्ता, लेखक, कवी यांचा मूळ गाभा एकच असावा. समाजाचे हित वाङमयामध्ये आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मूळ घटक असून संमेलन हरिनाम सप्ताहात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. 
राजा माने अध्यक्षपदावरुन बोलताना म्हणाले की, विविध साहित्य संमेलने बार्शीत घेऊन साहित्याची भूक भागवण्याचा प्रयत्न होत असून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सामोरे जाण्याचा प्रयत्न बार्शीकर करतात. प्रास्तविक महारुद्र जाधव यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत कवी फुलचंद नागटिळक यांनी केले. 

ठळक क्षणचित्रे 
ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ 
लोककलावंत, वारकरी, वासुदेव यांचा दिंडीत समावेश 
शेतकरी, कष्टकरी यांच्या साहित्याला संमेलनात स्थान 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com