
मिळकत कराच्या सूटमध्ये आकड्यांचा खेळ
सोलापूर - महापालिकेच्यावतीने ग्रीन उपक्रमाला प्रोत्साहन देणे आणि मुदतीत कर भरणा व्हावी यासाठी महापालिका करांवर आकर्षक सूट देते. मात्र, मिळकत करपत्राच्या एकूण रकमेवर सरसकट ही सूट दिली जात नाही. त्यातून शासनाचे कर वगळून उर्वरित रकमेवर दिले जात आहे. या मिळकत करांमधील आकड्यांच्या खेळाने नागरिकांमध्ये संभ्रम वाढविला आहे.
महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कर पत्रकामध्ये विविध प्रकारच्या नऊ करांचा समावेश आहे. त्यात शिक्षण कर व रोजगार हमी कर या दोन प्रकारच्या करांमधून मिळणारी रक्कम ही थेट शासनाकडे वर्ग होते. तर उर्वरित सर्वसाधारण कर, सफाई पट्टी, सार्वजनिक पाणीपट्टी, खासगी नळ, युजर चार्जेस, घनकचरा व्यवस्थापन या सात कराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मिळकत कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मुदतीत महसूल मिळावे आणि पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेने मिळकतदारांसाठी विविध उपक्रमांतर्गत मिळकत करावर आकर्षक सूट दिली आहे.
या उपक्रमांतर्गत मिळकतदारांना कमीतकमी २ ते अधिकाधिक १२ टक्क्यांपर्यंत सूट मिळविता येते. बहुतांश नागरिक या आकर्षक करापोटी सूट मिळविताना प्रत्यक्षात आकड्यांचा घोळ जाणवत आहे. त्यामुळे कर विभागात सूट घेणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. ही आकर्षक सूट एकूण मिळकत करबिलाच्या रकमेवर देण्यात येत असल्याचा नागरिकांचा भ्रम होता. परंतु यामध्ये शासनाचे कर वगळण्यात आले आहेत. तसेच जूना थकबाकीदार असल्यास नोटीस फी, वारंट फी, शास्ती या तीन दंडात्मक रकमेवर ही सूट दिली जात नाही. त्यामुळे मिळकत आकर्षक सूटबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाच्या कोणत्याही करावर सूट देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या एकूण करावर आयुक्तांच्या अधिकारांतर्गत सूट जाहीर केली जाते. तसेच एखादा थकबाकीदार असेल तरी नोटीस फी, वारंट फी आणि शास्ती अशा दंडात्मक रकमेवरदेखील कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही. नागरिकांनी ऑनलाईनद्वारे वेळेत कर भरून ६ टक्के सूटचा थेट लाभ घ्यावा.
- श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त.
अशी मिळते आकर्षक सूट
पावसाचे पाणी फिल्टर करून बोअरमध्ये सोडणे (रेनवाटर हार्वेस्टिंग) : २ टक्के
पावसाचे पाणी संपामध्ये साठविणे त्याचा पुनर्वापर (रेनवाटर हार्वेस्टिंग) : ३ टक्के
वैयक्तिक आणि सोसायटी सोलार सिस्टिम : ५ टक्के
मुदतीत बिल रोखीने भरल्यास : ५ टक्के
मुदतीत परंतु ऑनलाईन बिल भरल्यास : ६ टक्के
११७ मिळकतदार घेतात लाभ
बोअरद्वारे रेनवाटर हार्वेस्टिंगचे लाभार्थी : ६९
संपाद्वारे रेनवाट हार्वेस्टिंगचे लाभार्थी : ४
सोलारचे लाभार्थी : ४४
Web Title: Increased Confusion Among Citizens Over Income Taxes Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..