'इंद्रायणी एक्स्प्रेस’ २५ दिवसांसाठी रद्द` | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indrayani Express canceled for 25 days
'इंद्रायणी एक्स्प्रेस’ २५ दिवसांसाठी रद्द

'इंद्रायणी एक्स्प्रेस’ २५ दिवसांसाठी रद्द

सोलापूर - मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने सोमवार (१८ जुलै) रोजी सुरु केली. प्रवाशांनी इंद्रायणी एक्स्प्रेसचे गाजत-वाजत सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. मागील पाच दिवसानंतर लगेचच भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सोमवार २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे. यादरम्यान सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून, याचा सर्वाधिक फटका इंद्रायणी एक्स्प्रेसने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सोलापूरकरांना बसणार आहे.

सोलापूर विभागात दौंड-कुर्डूवाडी विभागात भिगवण-वाशिंबे या २६ किलोमीटरच्या मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे. हे काम सोमवर २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून, यात एकूण दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, अवघ्या पाच दिवसात गाडी पुन्हा रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोकरदार, शिक्षण, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी यांनी आधीच तिकीट आरक्षीत करुन ठेवलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

रद्द झालेल्या एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या

सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, भुनेश्वर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस, चेन्नई-साईनगर शिर्डी साप्ताहिक एक्स्प्रेस, अहमदाबाद-यशवंतपुर साप्ताहिक एक्स्प्रेस, दादर-पंढरपूर त्रीसाप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन सुटणारी गाडी पुणे, दौंड, कुर्डूवाडी, वाडी या मार्गाने पुणे, मिरज, कुर्डूवाडी, वाडी मार्गे वळविण्यात आली आहे.

भिगवन-वाशिंबे दरम्यान सुरु असलेले दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, नॉन इंटरलॉकिगच्या कामसाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य आठ गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर.

Web Title: Indrayani Express Canceled For 25 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top