esakal | Solapur : दोन एन्काउंटर, राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे

स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार प्राप्त करमाळा तालुक्‍याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे.

राष्ट्रपती शौर्यपदक विजेते! खाकी वर्दीतील सिंघम हर्षद काळे

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : दोन एन्काउंटर, उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहा वर्षात शासनाचे सहा पुरस्कार, 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी (Terrorists) लढा, नक्षलवाद्यांशी (Naxalites) अनेकवेळा चकमक, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट (German bakery) प्रकरणाचा तपास तसेच आकर्षक अशा शरीरयष्टीमुळे खाकी वर्दीतील दबंग, सिंघम, एन्काउंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार प्राप्त करमाळा (Karmala) तालुक्‍याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे (Harshad Kale).

पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे हे मूळचे करमाळा तालुक्‍यातील रहिवासी. वडील मंत्रालयात चांगल्या पदाच्या नोकरीवर असल्याने संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. घरात एखादा तरी फौजदार अधिकारी व्हावा अशी कुटुंबातील सर्व सदस्यांची इच्छा होती. त्यानुसार हर्षद यांना तसे शिक्षण व मार्गदर्शन वडिलांनी केले. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी हर्षद यांच्याकडे असताना देखील, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलिस अधिकारी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. प्रथम ते 2006 मध्ये मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले. अनेक गुन्ह्यांमधील अट्टल गुन्हेगार पकडण्यात ते तरबेज व आव्हानात्मक काम करण्याची त्यांना आवड असल्याने इच्छेनुसार 2008 साली तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांनी स्वतः त्यांची मुलाखत घेऊन "एटीएस'ला घेतले.

दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना हर्षद काळे यांनी पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरण, रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण अशा विविध मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात ते सामील होते. खाकी वर्दीबद्दल मनात प्रचंड आदर व आकर्षण असलेल्या व देशासाठी सेवा करण्याची आवड असलेल्या हर्षद यांनी आपल्या दमदार कामगिरीने पोलिस खात्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली. पुढे देशावर मोठे संकट आले असताना, मुंबईत 26/11 रोजी हल्ला झाल्यानंतर स्वतः ताज हॉटेलमध्ये तीन दिवस दहशतवाद्यांशी लढा देत होते. यावेळी अनेक लोकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढत अनेकांचे प्राण वाचवले. 2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून वडिलांचे फौजदार होण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

हेही वाचा: डॉक्‍टर अपहरण : अखेर सात किडनॅपर मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात अतिसंवेदनशील असलेल्या भागात झाली. या भागात नक्षलवाद्यांशी अनेकवेळा चकमक झाली. त्यानंतर छत्तीसगडच्या सीमारेषेवर अनेकवेळा पोलिसांवर गोळीबार केलेल्या नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या असलेल्या दोन नक्षलवाद्यांना ठार केले. या कामगिरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोली येथे जाऊन त्यांचा सन्मान केला होता व केंद्र सरकारचे बक्षीस देखील त्यांना मिळाले. गडचिरोलीतील या कामगिरीबद्दल शासनाच्या वतीने पोलिसांच्या दृष्टीने सर्वोच्च मोठे असलेले "राष्ट्रपती शौर्य पदक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर तेथे केलेल्या उल्लेखनीय व खडतर कामगिरीबद्दल शासनाच्या वतीने आजतागायत त्यांना आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सुरक्षा पदक, विशेष सेवा पदक, पोलिस महासंचालक पदक अशा पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी अवघ्या सहा वर्षात केली आहे.

हेही वाचा: प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू

पोलिसांचे काम हे सतत धावपळीचे असते. त्यामुळे स्वतःचे छंद जोपासता येत नाहीत. परंतु हर्षद यांनी आपली आवड जोपासली आहे. त्यांना शारीरिक फिटनेसचा छंद असून, त्यांनी भारदस्तपणा वाटेल अशी शरीरयष्टी बनवली आहे. जणू खाकी वर्दीत सिनेमातील अभिनेता असावा अशी त्यांची देहबोली असून त्यामुळे अनेक युवकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. प्रेरणादायी वक्ते म्हणून देखील नागरिकांना ते परिचित आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक चाहते असून, कमी कालावधीत देशसेवेसाठी काम करत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.

loading image
go to top