esakal | प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

crime

तालुक्‍यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण याचा 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी मृत्यू झाला होता. हा प्रकार नरबळीचा असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले होते.

प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण (Pratik Shivsharan) याचा 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी मृत्यू झाला होता. हा प्रकार नरबळीचा (Crime) असल्याचे पोलिस (police) तपासातून निष्पन्न झाले होते. या नरबळी प्रकरणात कारागृहात असलेला संशयित आरोपी श्री संत दामाजी साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब डोके (Nanasaheb Doke) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: सायकल चालवा, पर्यावरण वाचवा ! शेतकऱ्याच्या मुलीचा 27 जिल्हे अन्‌ 13000 किमी प्रवास

27 ऑक्‍टोबर 2018 रोजी माचणूर येथील प्रतीक शिवशरण हा बालक शाळेच्या तासावरून घरी येऊन जेवण करून मित्राबरोबर फिरावयास गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्याच्या आई - वडिलांनी तपास घेतला असता त्याचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला. पोलिस तपासात त्याचा मृत्यू नरबळीमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आरोपीला पकडण्यास विलंब होत असल्याप्रकरणी नागपूर - रत्नागिरी महामार्गावर बेगमपूर येथे ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर जनहित शेतकरी संघटनेने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर वेगळ्या मार्गाने आंदोलन केले होते. तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, तत्कालीन आमदार स्व. भारत भालके यांच्याबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शिवशरण कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु, आरोपी लवकर ताब्यात येत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: मनोहर भोसलेला पुन्हा चार दिवसांची कोठडी

अखेर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब डोके व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले होते. तपासात त्याने प्रतीकची नरबळी प्रकरणातून हत्या केल्याची कबुली दिली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात डोके याच्यावर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा पुणे येथे बुधवारी रात्री मृत्यू झाला.

loading image
go to top