esakal | दर्शनाच्या ऑनलाइन पाससाठी दोन्ही डोसचे बंधन! जाणून घ्या नवे नियम | Navratri Festival News
sakal

बोलून बातमी शोधा

दर्शनाच्या ऑनलाइन पाससाठी दोन्ही डोसचे बंधन! जाणून घ्या नवे नियम

नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

दर्शनाच्या ऑनलाइन पाससाठी दोन्ही डोसचे बंधन! जाणून घ्या नवे नियम

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri Festival) देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा (Covid-19) संसर्ग वाढू नये म्हणून स्थानिक पोलिसांची (Police) मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, श्री रुपाभवानी मंदिर, श्री शिवगंगा मंदिर, श्री विश्‍वब्राह्मण कालिका मंदिर, श्री हिंगुलांबिका मंदिर, कालिका मंदिर, पाच्छा पेठ आणि शिवलाड तेली समाज मंदिर, शुक्रवार पेठ यांनी भाविकांसाठी ऑनलाइन पासची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मात्र, भाविकांना कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.

हेही वाचा: नवरात्रोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाहीच! जाणून घ्या नियमावली

शारदीय नवरात्रोत्सव दिवशी राज्यातील सर्व धार्मिक मंदिरे खुली केली जाणार आहेत. परंतु, कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याने मंदिरात गर्दी होणार नाही, याची जबाबदारी मंदिर समितीचे ट्रस्ट व व्यवस्थापकांवर राहील. भाविकांनी दर्शनासाठी डिजिटल पासचा वापर करावा, असे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्‍तांनी शहरातील मंदिरांसंदर्भात स्वतंत्र आदेश काढले.

आदेशानुसार मंदिरे उघडी ठेवण्याची वेळ संबंधित ट्रस्ट तथा व्यवस्थापन मंडळ निश्‍चित करेल. तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडे मास्क असणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करताना त्यांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांना हॅंडवॉश, सॅनिटायझर द्यावे असेही आयुक्‍तांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. दर्शन रांगेत दोन भाविकांमधील अंतर किमान पाच ते सहा फुटांचे असणे बंधनकारक आहे. दसऱ्या निमित्ताने रावण दहन करण्याची प्रथा आहे. त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यावेळी प्रेक्षक नसावेत, मोजक्‍याच व्यक्‍तींनी तो कार्यक्रम पार पाडावा, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे.

पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर म्हणाल्या...

  • दर्शन पास काढण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

  • दर्शनासाठी येताना लसीकरणाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र सोबत आणावे

  • www.shrirupabhavanidevsthan.com वरून काढावा दर्शन पास

  • ऑनलाइन अर्ज करताना देवस्थान, दर्शनाचा वार, वेळ भरून सोबत येणाऱ्या व्यक्‍तींची माहिती भरावी

  • माहिती पूर्ण भरून अर्ज सबमिट करून त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवावा अन्‌ दर्शनासाठी आल्यावर दाखवावा

  • दर्शनाला जाण्याच्या दोन दिवसांपूर्वी दर्शनासाठी ऑनलाइन पास काढावा

loading image
go to top