मंगळवेढ्यातील 52 ग्रामसेवकांवर आली विनावेतन दिवाळी साजरी करण्याची वेळ !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gramsevak

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना गावगाड्याचा कारभार आणि अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करताना ग्रामसेवक दिसत आहेत. मात्र अतिवृष्टीचे पंचनामे करून प्रशासनाला वेळीच माहिती देऊन देखील विनावेतन दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ तालुक्‍यातील 52 ग्रामसेवकांवर आली आहे.

मंगळवेढ्यातील 52 ग्रामसेवकांवर आली विनावेतन दिवाळी साजरी करण्याची वेळ ! 

मंगळवेढा (सोलापूर) : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना गावगाड्याचा कारभार आणि अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करताना ग्रामसेवक दिसत आहेत. मात्र अतिवृष्टीचे पंचनामे करून प्रशासनाला वेळीच माहिती देऊन देखील विनावेतन दिवाळीचा सण साजरा करण्याची वेळ तालुक्‍यातील 52 ग्रामसेवकांवर आली आहे. 

तालुक्‍यातील 81 गावांत 55 ग्रामसेवकांपैकी 52 ग्रामसेवक कार्यरत असून, काही ग्रामसेवकांकडे एकापेक्षा अधिक गावांचा पदभार आहे. अशा परिस्थितीत 14 व्या वित्त आयोगातील मंजूर विकासकामे, खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतील कामे, पंधराव्या वित्त आयोगातील प्रस्तावित कामे, प्रशासनाकडून मागितली जाणारी गावगाड्यातील माहिती अशी कामे करत ग्रामपंचायत कराची वसुली करून ग्रामीण जनतेसह सरपंच व ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्यांची मनधरणी करताना ग्रामसेवकांना नाकीनऊ येत आहे. एखाद्या प्रकरणात दिरंगाई झाल्यावर कारवाईच्या रडारवर देखील ग्रामसेवकच असतो. अशा परिस्थितीत नुकत्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली. 

तालुक्‍यामध्ये ज्या गावांची जबाबदारी ग्रामसेवकावर होती त्यांनी त्या गावाच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतची माहिती वेळेत दिली. परंतु दिवाळीचा सण तोंडावर आला असताना देखील या ग्रामसेवकांना अजूनही त्यांचे वेतन दिले गेले नाही. नियमित वेतन झाले नसल्यामुळे त्यांना हा सण अंधारात साजरा करण्याची वेळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आली आहे. त्यामुळे ग्रामसेवक वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर महामंडळाने तत्काळ वेतन अदा केले; अशा प्रकारच्या कृतीची वाट मंगळवेढ्यातील पंचायत समिती प्रशासन पाहात आहे का, असा सवाल देखील या निमित्ताने विचारला जात आहे. प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे याचा फटका ग्रामसेवक वर्गाला बसत आहे. 

याबाबत सभापती प्रेरणा मासाळ म्हणाल्या, दिवाळीपूर्वी ग्रामसेवकाचे वेतन अदा करण्याच्या सूचना प्रशासनाला यापूर्वी दिल्या आहेत. तरीही कोणत्या कारणावरून विलंब होत असेल तर या प्रकरणी लक्ष घालून तत्काळ त्यांचे वेतन अदा करण्याठी प्रयत्नशील आहे. 
प्रेरणा मासाळ सभापती 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top